रामलीला मैदानावरील आंदोलन दिल्लीची खुर्ची हलवणार? : खेडवासीयांचाही सहभाग
वाफगाव – कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन मोर्चा राज्यापुरता मर्यादित न राहता आता देशव्यापी झाला आहे. काही राज्ये जुनी पेन्शन देणेबाबत आग्रही असताना भाजपप्रणित राज्यांत दिल्ली दबावामुळे लागू करत नाही म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष विजयबंधू व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वितेष खांडेकर यांच्या नेतृत्वाखालील दिल्लीतील रामलीला मैदानावर लाख्खोंची गर्दी करत.
जो जुनी पेन्शन योजना लागू करेल त्यांनाच मतदान करू अशी जाहीर प्रतिज्ञा रामलीलावर दुमदुमली. यामुळे जुनी पेन्शनचा मुद्दा दिल्लीच्या खुर्चीवर परिणाम करणारा घटक ठरण्याची दाट शक्यता आहे. यामुळे पेन्शन आता कोणाला टेन्शन देते हे निवडणूकीत नंतर समजलेच. याविषयी भाजप आणि कॉंग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एका कर्मचाऱ्यामागे कमीत कमी 50 ते 100 मतदान असून वेळ पडल्यास निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी विजयबंधूनी बोलून दाखवली. या आंदोलनाला शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत उपस्थित राहून कर्मचारी हे शेतकऱ्यांचीच मुले आहेत. याला संपूर्ण पाठिंबा दर्शवून लढा अधिक बळकट झाल्याचे टिकैत यांनी नमूद केले.
गेली आठ वर्षे संघटना लढा देत आहे; मात्र शासन गेंड्याची कातडी पांघरूण बसले आहे. यामुळे कर्मचारी आता चिडला असून या सरकारचे करायचं काय ? खाली मुंडकं वर पाय जो पेन्शन की बात करेगा, वही देश पे राज करेगा या घोषणांनी रामलीला नव्हे तर दिल्ली दुमदुमली आहे.
या आंदोलनाला खेड तालुका अध्यक्ष सचिन गावडे, उपाध्यक्ष शरद कुऱ्हाडे, हरिष हजारे, विठ्ठल भटकर, विशाल शिंदे, सरचिटणीस प्रशांत कुंजीर, प्रसिद्धी प्रमुख सलिम शेख, संघटक भरत चिंचकर, सुजित हसे, जिल्हा प्रतिनिधी संजय लोखंडे आदी उपस्थित होते.