पुणे –खडकमाळ आळी परिसरातील घोरपडी पेठेत घरफोडीच्या उद्देशाने घुसलेल्या चोरट्याशी प्रतिकार करणाऱ्या तरुणावर गुरुवारी दुपारी पिस्तूलातून दोन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतरही तरुणाने धाडस दाखवत चोरट्यास पकडून ठेवले.
गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत चोरट्याला पकडले. या घटनेत घरमालक किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली. त्याची महिला साथीदार फरार झाली आहे.
विठ्ठल वामन भोळे (मूळ रा. जळगाव, सध्या रा. हडपसर) असे आरोपीचे नाव आहे. तर, आवेज सलीम अन्सारी (23) असे धाडसी तरुणाचे नाव आहे.
आवेज अन्सारी कुटुंबाचे शहरात दोन ते तीन ठिकाणी व्यवसाय आहेत. बालाजीनगर येथे स्नॅक्सचा व्यवसाय आहे. त्याचे कुटुंब बाहेरगावी गेले होते. यामुळे दुपारी एकच्या सुमारास तो स्नॅक्स घेऊन घरी आला होता.
तो राहात असलेल्या घराच्या वरच्या मजल्यावर नाष्टा करत असताना त्याला खालच्या मजल्यावर काही हालचाल सुरू असल्याचा आवाज आला. त्यामुळे तो तातडीने खाली आला असता त्याला आरोपी भोळे हा बॅगेत काहीतरी भरत असल्याचे दिसले. त्याच्या घरात यापूर्वी चोरी झाल्याने यावेळी सावध होत आवेजने भोळेला पकडले. मात्र, भोळेने आक्रमक होत त्याला ढकलून देत खिशातून पिस्तूल काढले. याही परिस्थितीत आवेजने भोळेला पकडण्याचा प्रयत्न केला.
मात्र, भोळेने त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. गोळ्यांचा आवाज ऐकत राम बांगड तेथे धावत आले. त्यांनी आवेजला सहकार्य करत भोळेला पकडले. यानंतर इतरही नागरिक जमा झाले. त्यांनी भोळेला पकडून ठेवत पोलिसांना पाचारण केले. दरम्यान, आवेजच्या हाताला झटापटीत जखम झाली होती. पोलिसांनी तातडीने भोळेला ताब्यात घेत पिस्तूल हस्तगत केले.
भोळेसोबत एक महिलाही होती. ती या गडबडीत कटावणी घेऊन पळून गेली. तीचाही शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट म्हणाले की, खडकमाळ आळी परिसरातील हीना टॉवर इमारतीत चोरटा चोरी करण्याच्या उद्देशाने शिरला होता. त्यावेळी तेथे गेलेल्या तरूणाने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चोरट्याने गोळीबार केला. तसेच त्याच्या हाताचा चावा घेत जखमी केले. आरोपीविरुद्ध घरफोडीचे गुन्हे असून त्याच्याकडून जिंवत राउंड आणि पिस्तूल ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
भोळे करतो दिवसाच घरफोडी भोळे हा नाशिक पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, घरफोडी असे गुन्हे आहेत. करोना रजेवर तो कारागृहातून बाहेर पडला आहे. तो दिवसाच घरफोडी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
इमारतीत आमचे दोन फ्लॅट आहेत. मी खालच्या फ्लॅटवर आल्यावर त्याने पिस्तूल काढली. मात्र, मी विरोध करताच, त्याने चाकूनेही वार केला. मी तो चुकवल्याने, त्याने पिस्तूलातून गोळ्या झाडल्या. मात्र, मी हिम्मत दाखवत त्याला विरोध केला. – आवेज अन्सारी