मुंबई – जॉन अब्राहम प्राण्यांचा किती चाहता आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. त्याने आपल्या या प्रेमाचे दर्शन एका जाहिरातीमधून दाखवून दिले आहे.
“मर्सी फॉर ऍनिमल्स इन इंडिया’ च्या एका जाहिरातीमध्ये त्याने पब्लिकला प्राण्यांवर प्रेम करण्याचेच आवाहन केले आहे. “इन द वर्ल्ड व्हेअर यू कॅन ब एनिथिंग, बी नाइस’ अशी या जाहिरातीची टॅगलाइन आहे.
प्राण्यांनाही प्रेम, आदर आणि स्वातंत्र्य मिळवण्याचा अधिकार आहे. प्राण्याबरोबर चांगले वर्तन करून आपण प्राण्यांना मदतच करू शकतो, असे डॉनने या जाहिरातीत म्हटले आहे.
प्राण्यांच्या गरजेच्यावेळी आपण नेहमीच त्यांच्या मदतीसाठी तयार असणार आहोत.याच कामासाठी “मर्सी फॉर ऍनिमल्स इन इंडिया’मध्ये सहभागी झाल्याबद्दल आपल्याला खूप आनंद होतो आहे, असे जॉनने म्हटले आहे.
प्राण्यांबरोबर अमानुष वागणूक करण्याच्या विरोधातील निवेदनावर स्वाक्षरी करण्याचे आवाहनही त्याने केले आहे. हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवले जाणार आहे.
जॉनने यापूर्वीही प्राणीमित्र संघटनांसाठी वेगवेगळ्या अभियानांमध्ये भाग घेतला होता. प्राणी संरक्षणाचे अधिकार अधिक कडक करावेत यासारख्या मागणीसाठी त्याने पुढाकारही घेतला होता.