मुंबई – शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुंबईतील स्थानिक नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या फेसबुक लाइव्हदरम्यान झालेल्या खळबळजनक हत्येचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन पथके तयार केली आहेत. भाजप आमदाराने पोलिस ठाण्यातच गोळीबार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच हा राजकीय हिंसाचाराचा दुसरा प्रकार घडल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीवरून विरोधीपक्षांनी राज्य सरकारवर आणि गृहमंत्र्यांवर चौफेर टीका केली आहे.
इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एक पथक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास करत आहे, तर दुसरी टीम त्यांचा मारेकरी मॉरिस नोरोन्हा याच्या मृत्यूचा तपास करत आहे, असे वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. नोरोन्हा याला शस्त्र कसे मिळाले आणि ते कोणी पुरवले, त्यावेळी तो दारूच्या नशेत होता का, या अनुषंगाने चौकशी केली जात आहे. घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला तेव्हा घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या चौकशीवरही गुन्हे शाखेच्या तपासात लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे निष्ठावंत माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा अभिषेक (४०) हाही माजी नगरसेवक होता. गुरुवारी संध्याकाळी बोरिवली (पश्चिम) च्या उत्तर उपनगरातील आयसी कॉलनीतील हल्लेखोर मॉरिस नोरोन्हा यांच्या कार्यालयात घडलेल्या या घटनेचा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये घोसाळकर यांच्या पोटात आणि खांद्यावर गोळी लागल्याचे दिसून आले आहे.
घोसाळकर यांना चार गोळ्या लागल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. गुन्ह्यासाठी बेकायदेशीर पिस्तूल वापरणाऱ्या नोरोन्हाने नंतर स्वत:वर गोळी झाडली, असेही तो म्हणाला. घोसाळकर आणि नोरोन्हा यांचे वैयक्तिक वैर होते, परंतु आयसी कॉलनी परिसराच्या भल्यासाठी त्यांच्यातील कटुता संपवून ते एकत्र आल्याचे स्पष्ट करण्यासाठी फेसबुक लाइव्हची व्यवस्था करण्यात आली होती, असे आणखी एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
एमएचबी कॉलनी पोलिसांनी हत्येनंतर गुन्हा दाखल केला, तर पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्य नारायण आणि पोलीस उपायुक्त (डीसीपी) दत्ता नलावडे यांनी तपासासाठी घटनास्थळी भेट दिली. काल रात्री उशिरा घडलेले हे प्रकरण पुढील तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाचे गांभीर्य आणि तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पथकाने तपास सुरू केला असून पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
घोसाळकर यांना गोळ्या घातल्या तेव्हा नोरोन्हा दारूच्या नशेत होता असे सांगण्यात येत आहे, त्यांच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. दरम्यान ठाकरे गटाचे शेकडो समर्थक उत्तर मुंबईतील करुणा हॉस्पिटलच्या बाहेर जमले होते, जिथे अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना तेथे दाखल करण्यात आले होते.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी पहाटे घोसाळकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी जेजे रुग्णालयात हलवण्यात आला.दरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांनी घोसाळकर यांच्या निवासस्थानी भेट दिली.