नवी दिल्ली – काशी विश्वनाथ मंदिरातील पुजाऱ्यांची आता वेतन आणि विविध भत्त्यांसह नियुक्ती केली जाणार आहे. काशी विश्वनाथ मंदिर न्यासाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. वाराणसीच्या मंडलायुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत सगळी नियमावलीही तयार करण्यात आली आहे.
नियमावलीनुसार पुजाऱ्यांची श्रेणी, वेतन आणि त्यांचा ड्रेस कोडही ठरवण्यात आला आहे. ड्रेसकोडमध्ये कुर्ता- धोतर आणि उपरणे आदींचा समावेश असेल. पूजा सेवा नियमावली असे या नियमावलीचेही नामकरण करण्यात आले आहे.
मंदिरात एकूण ५० पुजाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असून त्यांच्या तीन श्रेणी असतील. सगळ्यांत ज्येष्ठ पुजाऱ्याला ज्येष्ठ पुजारी (अर्चक) म्हटले जाणार असून त्यांना ९० हजार रूपये दिले जातील. त्यांच्यापेक्षा लहान पुजाऱ्याला कनिष्ठ अर्चक असे संबोधले जाईल व त्यांचे वेतन ७० हजार रूपये असेल. त्यानंतर सहायक अर्चक असतील आणि त्यांना ४५ हजार रूपये दिले जातील. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व अर्चकांना भत्तेही दिले जाणार आहेत.
शाळा आणि महाविद्यालयांच्या स्तरावर संस्कृत स्पर्धा घेतल्या जाण्याचा निर्णयही काशी विश्वनाथ मंदिर न्यासाचे अध्यक्ष प्रा. नागेंद्र पांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. संस्कृत विद्यापीठाला सहकार्य केले जाण्याचा प्रस्ताव न्यासाचे सदस्य आणि संपूर्णानंद विद्यापीठाचे कुलपती प्रा. बिहारी लाल यांनी यावेळी मांडला. दरम्यान, मंदिराच्या सुविधा वाढवण्यासाठी नवीन जमीन आणि भवन खरेदी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. भाविकांसाठी मार्गाचे रूंदीकरण आणि पार्किंगची सुविधा वाढवली जाणार आहे. जमीन आणि नव्या इमारतीसाठी एका आर्किटेक्टचीही नियुक्ती केली जाणार आहे.