पुणे – गणेश पेठेतील बुरडी पुलाजवळच्या नाल्याकडेला लघुशंकेसाठी गेलेल्या युवकाचा पाय घसरला आणि तो नाल्यात बुडाला. ही घटना शनिवारी मध्यरात्री दोन वाजता घडली. सुदैवाने या युवकाला पोहता येत होते. पण, पाण्याच्या प्रवाह एवढा होता, की हा युवक नाल्यातील एका कप्प्याजवळ अडकला. यासंदर्भात अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला वर्दी मिळताच मुख्यालयातून जवानांचे पथक रवाना झाले.
जवान पोहोचताच त्यांनी पाण्याचा प्रवाह पाहून युवकाला जिवंत बाहेर काढण्याचे आव्हान समोर होते. अधिकारी समीर शेख यांनी तातडीने निर्णय घेत जवान प्रकाश शेलार यांनी प्रवाहात उडी मारत सोबत शोध सुरू केला. आतमधे पहिली फेरी मारत काहीच न मिळाल्याने शेलार बाहेर आले. जरा उसंत घेत परत डुबकी मारत शोध घेतला असता शेलार यांना अडकलेला युवक दिसला. युवकानेही जवानाला पाहताच “फायरब्रिगेड येणार आणि मी वाचणार हे माहीतच होते,’ अशी प्रतिक्रिया दिली. यावर क्षणाचाही विलंब न करता युवकास दोरी बांधून सुखरूप बाहेर आणले. युवक सुखरूप असून त्याला प्राथमिक उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.