कन्नौज – उत्तरप्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात एक खासगी डबल डेकर स्लीपर बस एका ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातानंतर बसने अचानक पेट घेतला. त्यात दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अन्य अनेक जण जखमी झाले र्आहेत. बसमध्ये एकूण 45 प्रवासी आणि तीन कर्मचारी असे एकूण 48 जण होते. बस जयपुरहून फारुखाबाद कडे चालली होती. लखनौ पासून 168 किमी अंतरावर छिब्रामाऊ येथे जीटी रोडवर शुक्रवारी रात्री हा अपघात झाला. आगीत बस पुर्णपणे जळून खाक झाली त्यातूनच हे दहा प्रवाशांचे पुर्ण जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले.
अपघातातील 21 जखमींना सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किरकोळ जखमींना जवळच्याच खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनाधिकृत वृत्तानुसार या अपघातात एकूण वीस जण ठार झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की अपघाताच्या धडकेनंतर बसचा डिझेल टॅंक फुटला. त्यामुळे ही आग लागली. मुख्यमंत्री अदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले असून जखमींना प्रत्येकी 50 हजार रूपये दिले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही दुर्घटनेतील मृतांच्या कुटुबियांप्रती सहानुभुती व्यक्त केली आहे.