फिनिशर धोनीही सचिनच्या मार्गावर

नवी दिल्ली –चीनच्या भागीदारीत असलेल्या पेटीएम कंपनीशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने करार केल्यानंतर टीकेची झोड उठली असतानाच आता माजी कर्णधार व चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही चिनी कंपनी असलेल्या ओप्पो या कंपनीशी करार केल्याचे स्पष्ट झाले आहे. आता सचिनपाठोपाठ धोनीही टीकेचे लक्ष्य बनला आहे. 

यंदा करोनाच्या धोक्‍यामुळे भारतात होणारी आयपीएल स्पर्धा अमिरातीत होत आहे. या स्पर्धेला येत्या शनिवारपासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी धोनीने ओप्पो या कंपनीशी करार केल्याचे कंपनीनेच जाहीर केले आहे. लडाखमधील परिस्थितीमुळे भारत व चीन यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे देशात बॉयकॉट चायना ही मोहीमही जोर धरत आहे. त्याचमुळे बीसीसीआयनेही चिनी कंपनीशी असलेला करार संपुष्टात आणला होता व लोकभावनेचा आदर राखला होता. मात्र, या परिस्थितीची पूर्ण कल्पना असूनही सचिनपाठोपाठ आता धोनीनेही चिनी कंपनीशी करार केल्याने त्यालाही टीकेला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

धोनीचेही मौन 

चीनच्या कंपनीशी करार केल्यावर त्याची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न अनेक माध्यमांनी तसेच संकेतस्थळांच्या प्रतिनिधींनी केला. मात्र, धोनीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या वर्षी झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर विश्रांती घेतलेला धोनी भारतीय सेनादलाशी जोडला गेल्यावरही चीनच्या कंपनीशी कसा करार करू शकतो, असा प्रश्‍न आता सोशल मीडियावर विचारला जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.