#IPL : अर्जुनला खेळविण्यासाठी फिल्डिंग

दुबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने टीका होत आहे. त्यातच आता त्याच्या मुलाला अर्जुनला मुंबई इंडियन्सकडून यंदाच्या आयपीएल स्पर्धेत खेळविण्यासाठी फिल्डिंग सुरू असल्याचेही बोलले जात आहे. 

मुंबई इंडियन्स संघाच्या खेळाडूंसह अर्जुनही दिसल्याने सचिनवर नेपोटिजमबाबत टीका झाली. त्याचबरोबर चीनबरोबरच्या संबंधात तणाव असतानाही सचिनने चीनची भागीदारी असलेल्या कंपनीचा सदिच्छादूत म्हणून करार केल्याने सचिन पुन्हा एकदा टीकेचा धनी बनला.

आता अर्जुनला आयपीएल खेळविण्यासाठी फिल्डिंग लावली जात असल्याचे सांगितले जात असून त्यामुळे पुन्हा एकदा सचिनवर टीकेची झोड उठण्याची शक्‍यता आहे. अर्थात, अर्जुनसाठी सचिनने कोणाकडेही शब्द टाकलेला नसला तरीही त्याचे भक्‍त मुंबई क्रिकेट संघटनेवर मक्‍तेदारी ठेवून असल्याने सचिनच्या गुडबूकमध्ये येण्यासाठी ते हे कार्य करू शकतात असेही सांगितले जात आहे.
सध्या मुंबई इंडियन्स संघाचे खेळाडू अमिरातीत आयपीएलची तयारी करत असून त्यांच्या सराव सत्रात गोलंदाजी टाकण्यासाठी अर्जुनला अमिरातीला नेण्यात आले आहे. त्यावरूनही टीका सुरू झाली होती. अर्जुनला मुंबई इंडियन्सने आपल्या संघात स्थान दिलेले नाही. मग अर्जुन मुंबईच्या संघाबरोबर कसा, असा प्रश्‍नही विचारला गेला होता.

तो संघाबरोबर असला तरी त्याला स्पर्धेत खेळविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असले तरीही यंदाच्या स्पर्धेत किंवा पुढील वर्षी मार्चमध्ये भारतात होणाऱ्या स्पर्धेत त्याला संघात स्थान मिळणार नाही असे मात्र कोणी स्पष्ट केले नसल्याने याची चर्चा सुरू झाली आहे. आयपीएलच नव्हे तर प्रत्येक मोठ्या 

स्पर्धेत सहभागी होत असलेल्या संघांना सराव सत्रात गोलंदाजी करण्यासाठी काही खेळाडूंना बोलावले जाते. अर्जुनलाही त्याप्रमाणेच अमिरातीत नेण्यात आल्याचा खुलासा संघाकडून करण्यात आला असला तरीही सध्या त्याला आगामी काळात आयपीएलमध्ये खेळविण्यात येणार असल्याचे सांगितले
जात आहे.

सचिनचे मौन धक्‍कादायक 

अर्जुनचा मुंबई इंडियन्स संघाबरोबरचा वावर, चीनच्या कंपनीशी केलेला करार तसेच आगामी काळात अर्जुनला मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची असलेली संधी या सर्व गोष्टींवर सचिनकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सचिन या सर्व गोष्टींवर गप्प का, असा सवालही आता विचारला जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.