नगर – भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदी करीत असणाऱ्या महिलेच्या पर्समधून रोख रक्कम व दोन सोन्यांच्या मोरण्या चोरट्यांनी लांबविल्या. यशोदानगर भाजीमार्केटमध्ये गुरुवारी (दि.2) रात्री पावणेआठ वाजता ही घटना घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, ज्योती राजेश इवळे (रा. शेवंती बंगलो, पाइपलाइन रोड) या भाजी खरेदीसाठी यशोदानगर येथील भाजी मार्केटमध्ये गेल्या होत्या. त्यांच्या खांद्याला मोठी पर्स अडकविली होती.
इवळे या भाजी खरेदी करण्यात व्यस्त असताना कोणीतरी त्यांच्या पर्समधून 5 हजार 200 रुपयांची रोख रक्कम व दोन सोन्याच्या मोरण्या, असा एकूण 7 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरीचा प्रकार लक्षात येताच इवळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी ज्योती इवळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक शाहीन पठाण या करीत आहेत.