भोसरी – इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्यामुळे भोसरी येथे एका प्रिंटिंग प्रेसला आग लागली. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी दीडच्या सुमारास डी सेक्टर पवना कॉम्प्लेक्स येथे घडली. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भोसरी डी सेक्टर मधील पवना कॉम्प्लेक्स येथे गाळा क्रमांक 21 मध्ये प्रिंटिंग प्रेस आहे.
दुपारी दीडच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने मशीनला आग लागली. या आगीत सहा प्रिंटिंग मशीन, पेपर, फर्निचर आणि एक मोपेड दुचाकी जळून खाक झाली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन दलाचे पाच बंब आणि दोन देवदूत (मिनी व्हॅन) घटनास्थळी दाखल झाले. अडीच तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
उल्लेखनीय बाब अशी की गेल्या काही दिवसांमध्ये शहरता शॉर्टसर्किटमुळे होणाऱ्या आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषतः व्यावसायिक ठिकाणी, गोदामांना मोठ्या प्रमाणात आग लागत आहे. या आगींमध्ये मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. अग्निशमन यंत्रणा अद्यावत ठेवावी, वायरिंग व विजेची उपकरणे तपासून घ्यावीत आणि त्यांची नियमित देखभाल दुरुस्ती करावी, असे आवाहन अग्निशामक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.