राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा 16 जूनला

पिंपरी – दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावर प्रथम टप्प्यातील राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा झाल्यानंतर त्यातून निवड झालेले विद्यार्थी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (एनटीएस) परीक्षेसाठी पात्र होतात. या परीक्षेच्या वेळापत्रकात लोकसभा निवडणुकीमुळे बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा 12 मे ऐवजी नवीन वेळापत्रकानुसार येत्या 16 जूनला होणार आहे.
देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे.

सर्वच शासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामाला लागली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीमुळे विविध परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, दुसऱ्या टप्प्यातील राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षाही निवडणुकांमुळे प्रभावित झाली आहे. या परीक्षेसाठी पहिल्या टप्प्यातील राज्यस्तरीय परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड झाली असून, संबंधित निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र एनसीईआरटी (नवी दिल्ली) यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

एनसीईआरटीतर्फे एनटीएससाठी राज्यातून 387 विद्यार्थी कोटा होता. त्यानुसार निवडण्यात आलेल्या 387 विद्यार्थ्यांची निवड यादी 1 मार्च रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली असून एनसीईआरटीतर्फे महाराष्ट्रासाठी 2018 – 2019 आणि सन 2019 – 2020 साठी सुधारित कोटा 774 विद्यार्थी इतका वाढविण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वसाधारण गटातील 391, इतर मागासवर्गीय संवर्गातील 209, अनुसूचित जाती 116 व अनुसूचित जमाती 58 अशा एकूण 774 विद्यार्थ्यांचा कोटा आहे. संबंधित संवर्गातील समान गुणांचे विद्यार्थी समाविष्ट करून 775 विद्यार्थ्यांची निवड यादी एनसीईआरटीच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. परीक्षा लांबणीवर पडल्यामुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी अधिकचा वेळ मिळणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.