पुणे – दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत केल्याच्या आरोपावरून आणखी एकाला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली. झुल्फिकार बडोदावाला असे त्याचे नाव आहे. कोथरूडमधून अटक केलेले दोन दहशतवादी, तसेच त्यानंतर अटक करण्यात आलेल्या दोन्ही दहशतवाद्यांशी संपर्क असल्याचे राज्य एटीएसने केलेल्या तपासातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, त्याला न्यायालयाने दि. 11 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दहशतवाद्यांना पैसे पाठविणाऱ्या मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या सिमाब नसरुद्दीन काझी याला रत्नागिरी येथून नुकतीच अटक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ बडोदावालावर कारवाई करण्यात आली. बडोदावाला हा राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीत होता. न्यायालयाची परवानगी घेऊन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. आतापर्यंत या गुन्ह्यात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी केली.
बडोदावाला याने महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान आणि महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी या दोन दहशतवाद्यांना दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवले आहेत. त्याने या दोघांशी वेळोवेळी फोनवरून संपर्कदेखील साधला आहे. बडोदावालाला या गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली? त्याने नेमकी किती रक्कम दहशतवाद्यांना दिली? या सर्वांचा तपास करण्यासाठी त्याला एटीएस कोठडी देण्यात यावी, हा सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरीत सत्र न्यायाधीश एस. व्ही. कचरे यांनी बडोदावाला याला कोठडी सुनावली आहे.