देशाला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेणारा अर्थसंकल्प – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : शेतकरी, महिला आणि गाव- शहरांचा सर्वांगीण विकास याला केंद्रस्थानी ठेवून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात देशाला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्याचा प्रयत्न केला आहे, अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

देश महात्मा गांधीजी यांची १५० वी जयंती साजरी करत असताना त्यांना अभिप्रेत असलेला सक्षम गाव-सक्षम देश घडविण्याला या अर्थसंकल्पातून खऱ्या अर्थाने बळ मिळाले आहे.

देशाची अर्थव्यवस्था जी २०१३-१४ ला ११ व्या स्थानावर होती ती केवळ पाच वर्षात सहाव्या स्थानावर पोहोचली आहे. हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वातील केंद्र सरकारचे ठळक यश आहे. आर्थिक प्रगतीचा हा वेग पाहता येत्‍या काळात 5ट्रिलियन डॉलरचे लक्ष्‍य निश्‍चितपणे पूर्ण होईल यात मुळीच दुमत नाही. 2022 पर्यंत शेतकऱ्यांच्‍या उत्‍पन्‍नात दुप्‍पट वाढ करण्‍याचा संकल्‍प असो की 2022 पर्यंत प्रत्‍येक घरात वीज आणि एलपीजी गॅस पोहोचविण्‍याचा संकल्‍प असो या माध्‍यमातून सरकारची गरिबांच्‍या व शेतकऱ्यांच्या कल्‍याणाविषयीची सजगता स्‍पष्‍ट होते.

भारताला रोजगार प्रधान देश म्‍हणून मान्‍यता मिळवून देताना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करण्याचा संकल्प हा देशातील युवकांचे मनोबल उंचावणारा आहे. युवकांसाठी नॅशनल रिसर्च फाऊंडेशनची स्‍थापना हे युवाशक्‍तीच्‍या सशक्‍तीकरणाच्‍या प्रक्रियेतील महत्त्‍वपूर्ण पाऊल ठरणार आहे. नवीन उद्योग कॉरीडोरच्‍या माध्‍यमातून उद्योग क्षेत्राला सरकारने प्रोत्‍साहन दिले आहे. रोजगार,उद्योग व पायाभूत सुविधांसाठी करण्‍यात आलेली लक्षणीय तरतूद देशाच्‍या प्रगतीचा आलेख वाढत असल्‍याचे द्योतक आहे. अन्‍नदात्‍याला ऊर्जादाता करण्‍यासाठी विविध योजना राबवून त्‍याचे सशक्‍तीकरण करण्‍याचा सरकारचा मनोदय शेतकरी आणि गरीबों के सन्‍मान में, मोदी सरकार मैदान में हे स्‍पष्‍ट करणारा आहे, असेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

भारताला उच्‍च शिक्षणाचा हब बनविण्‍याचा संकल्‍प, खेळाडूंसाठी राष्‍ट्रीय शिक्षा बोर्ड स्‍थापन करण्‍याचा मनोदय, पायाभूत सुविधांच्या जोडणीवर दिलेला भर, हर घर जल सारखा नाविन्यपूर्ण कार्यक्रम, विदेशी विद्यार्थ्‍यांसाठी स्‍टडी इन इंडिया कार्यक्रम,प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कराबाबतची सुलभता आदींच्‍या माध्‍यमातून देशाच्या सामाजिक,आर्थिक क्षेत्राचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाने भरीव प्रयत्न केल्याचे दृष्टीपथात येते. सर्वच क्षेत्रांना न्‍याय देणारा सर्वस्‍पर्शी, सर्वसमावेशक व देशाला प्रगतीपथावर नेणारा हा अर्थसंकल्‍प आहे. या अर्थसंकल्‍पाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अभिनंदन करतो असेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.