मुंबई – अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच तिच्या विचित्र लुकमुळे चर्चेत असते. एका वेगळ्याच अंदाजात कपडे परिधान करत ती सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसते. यावरून अनेकदा तिला ट्रोल केले जाते. काही दिवसांपूर्वीच उर्फीच्या या हटके फॅशनची चर्चा राजकीय वर्तुळात देखील रंगली होती. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर कारवाई करण्याची देखील मागणी केली होती. मात्र आता अतरंगी कपडे परिधान केल्याबद्दल तिने माफी मागितली आहे.
उर्फीमध्ये आता काही प्रमाणात बदल झाल्याची चर्चा होत आहे. नुकतेच ती विचित्र फॅशन करण्यावरुन ट्वीट करत म्हणाली की, “मी ज्या प्रकारचे कपडे परिधान करते त्यामुळे बऱ्याच लोकांच्या भावना दुखावल्या आहेत त्याबद्दल मी त्यांची माफी मागते. यापुढे तुम्हाला उर्फीमध्ये बदल दिसेल.”
तिचे हे ट्वीट सध्या व्हायरल होत असून अनेकांनी तिच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. तर काही जण ती एप्रिल फूल करत असल्याचे म्हणत आहे. दरम्यान, उर्फीने हे ट्वीट 31 मार्च रोजी सायंकाळी केल्याने नेटकरी ती मस्करी करत असल्याचे म्हणत आहे. मात्र अद्याप तिचे असे ट्वीट करण्यामागचे कारण समजू शकलेले नाही.