पुणे : प्रकल्पांना ‘गती’ देण्यासाठी जिल्हाधिकारीच मैदानात

पुणे – जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या भूसंपादनाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे आहे. या प्रकल्पांना आवश्‍यक गती देण्यासाठी प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा दर मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख घेणार आहेत. यामुळे भूसंपादनाच्या कामांना गती मिळणार आहे.

मेट्रो, चांदणी चौक उड्डाणपूल, वर्तुळाकार रस्ते, पालखी मार्ग, रेल्वेमार्ग, भामा आसखेड अशा विविध प्रकल्पांचा यात समावेश आहे. याबाबत जिल्हाधिकारी म्हणाले, ठराविक भागांमध्येच करोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. या भागांना प्रतिबंधित करून व्यवहार पूर्ववत केले आहेत.

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांसह इतर सर्व शासकीय कार्यालयांमध्येही अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढवण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी काही हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे किंवा करण्यात येणार आहे. बहुतांशी प्रकल्पांच्या भूसंपादनाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे आहे. या पार्श्‍वभूमीवर भूसंपादन वेळेत होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे आढावा घेण्यात येणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावरील राहुल चित्रपटगृहासमोरील उड्डाणपूल पाडायचा की नाही, याबाबत पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. मेट्रो मार्गात अडथळा येत असल्याने विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्यात आले. मात्र या उड्डाणपुलाला जोडणारा राहुल चित्रपटगृहासमोरील पूल मेट्रो मार्गात अडथळा ठरत नसल्याचे आराखड्यावरून दिसत आहे. शिवाय हा पूल कायम ठेवून तेथून मेट्रो मार्ग करता येणार आहे. याठिकाणी काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार असून, भुयारी मार्ग आणि याशिवाय काही नवीन मार्ग बनवावे लागणार आहेत. ते केले, की हा पूल पाडण्याची वेळ येणार नाही, असा पर्याय तज्ज्ञांनी सुचवला आहे.
– विक्रम कुमार, आयुक्‍त, मनपा 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.