अखेर सहाव्या दिवशी मादी पिल्लाला घेऊन गेली

 वन विभागाचे अथक प्रयत्न, पिल्लाला पाजत होते मेंढीचे दूध, बिबट्याच्या हालचाली कॅमेराबद्ध

नॅशनल जिओग्राफीची टीमही येऊन गेली…
मादी पिल्लाजवळ येतेय, मात्र पिल्लाला नेत नाही, म्हणून जुन्नर येथील माणिकडोह बिबट्या पुनर्वसन केंद्राचे तज्ज्ञ डॉ. अजय देशमुख यांना घटनास्थळी येण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार ते आणि त्यांच्या समवेत इंग्लडहून नॅशनल जिओग्राफीसाठीच्या चित्रीकरणासाठी आलेली टीमसुद्धा येथे आली होती. डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे वनक्षेत्रपाल डॉ. अजित साजणे, रोहन भाटे आणि वनविभागाने सलग सहा दिवस प्रयत्न सुरूच ठेवले. त्याला अखेर सहाव्या दिवशी यश आले. नॅशनल जिओग्राफीसाठी चित्रीकरण करणारी टीम येथे येऊन गेल्याने त्यांनाही ग्रामीण भागातील बिबट्यांच्या वास्तव्याची माहिती मिळाली.

कराड – काले (ता. कराड) येथील चौगुले मळ्यातील करी नावाच्या शिवारात जयकर बाबुराव पाटील यांच्या उसाच्या शेतात आढळलेल्या बछड्यास सहाव्या दिवशी मादी सुखरूप घेऊन गेली. दरम्यान, ज्या ठिकाणी बछडा आढळला होता, त्या परिसरात वन विभागाने विविध प्रकारचे कॅमेरे लावले होते. तसेच मादीला बछड्याचा वास यावा, यासाठीही युक्‍त्या लढविल्या होत्या.

अखेर वन विभागाच्या प्रयत्नांना सहाव्या दिवशी यश आले. या सहा दिवसांत वनक्षेत्रपाल डॉ. अजित साजणे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल सुभाष पाटील, वनरक्षक योगेश पाटील, वनमजूर हणमंत मिठारे, धनाजी पाटील, वाहन चालक सौरभ लाड यांनी घेतलेल्या परिश्रमाचे प्राणीप्रेमींमधून कौतुक होत आहे. काले येथील जयकर पाटील यांच्या उसाच्या शेतात मंगळवार, दि. 9 रोजी सकाळी 10 वा. ऊसतोड सुरू होती. त्यावेळी उसाच्या फडातील सरीत बिबट्याचे दोन बछडे ऊसतोड मजुरांना आढळून आले होते. त्यातील एक बछडा मृतावस्थेत आणि दुसरा जिवंत होता. दरम्यानच्या काळात उसाच्या शेतात मादी असेल, म्हणून ऊसतोड मजुरांनी उसाचे शेत पेटवून दिले.

शेत पेटल्यामुळे उसात लपलेली मादी मागील बाजूने दुसऱ्या शेतात गेल्याचे लोकांनी पाहिले होते. त्यामुळे पोलीस पाटील दीपक पाटील यांनी वनक्षेत्रपाल डॉ. अजित साजणे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना घटनेची माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. जिवंत बछडा तीस ते चाळीस दिवसाचा होता. डॉ. हिंगमिरे यांनी बछड्याची तपासणी केली. तो मादी जातीचा आणि 2 किलो वजनाचा होता. उपासमारीमुळे मृत्यू झालेल्या बछड्याचे दहन करण्यात आले. त्यानंतर जिवंत बछड्यास दर तीन तासांनी मेंढीचे 25 मिली दूध पाजण्यात आले.

त्याच दिवशी आणि त्याच ठिकाणी बछड्यास कॅरेटमध्ये ठेवण्यात आले. सभोवती छायाचित्र ट्रॅपिंगचे कॅमेरे लावण्यात आले. त्या रात्री मादी दहाच्या सुमारास आणि पहाटे साडे चारला येऊन बछड्याचा वास घेऊन गेली. मात्र, बछड्याला नेले नाही. पिल्लाचा वास यावा, म्हणून वनविभागाने पाच दिवस युक्‍त्या लढविल्या. सलग पाचही दिवस मादी रात्रीत दोनवेळा येऊन जात होती. ती मादी प्रथमच व्याली असावी, असा अंदाज होता. तसेच ती सभोवतालच्या कॅमेरे, कॅरेटला घाबरत होती. अखेर रविवारी (दि. 14) सहाव्या दिवशी रात्री साडे नऊच्या सुमारास पिल्लाला घेऊन ती गेली. मात्र, पुन्हा तेथेच येऊन ती दुसऱ्या पिल्लाचा पहाटेपर्यंत शोध घेत होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.