मुद्देमालावर खासगी सुरक्षारक्षकाचा “वॉच’

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या

तळेगाव दाभाडे – कोट्यवधी रुपयांचा महसूल देणाऱ्या येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला सुरक्षारक्षक नसल्याने कार्यालयाची सुरक्षा “रामभरोसे’ आहे. या कार्यालयाच्या परिसरात केलेल्या करवाईतील लाखोंचा मुद्देमाल उघड्यावर पडलेला आहे. तळेगाव दाभाडे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षेत्रात मावळ व खेड तालुक्‍यातील बिअर बार, वाईन शॉप, देशी दारू आदींचे नूतनीकरण नवीन परवाना आदी कामे करून अवैध देशी, विदेशी व गावठी दारू साठवण व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांचा जप्त मुद्देमाल कार्यालयाच्या परिसरात ठेवला आहे.

या कार्यालयात सुरक्षा रक्षक नसल्याने त्यांना खासगी सुरक्षा रक्षक ठेवण्याची वेळ आली आहे. कारवाईतील मुद्देमालांची सुरक्षाच रामभरोसे झाली आहे. त्यातच या कार्यालयाचे मनुष्यबळ अपूर्ण असल्याने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असताना, वाईन शॉप सकाळी 10 ते रात्री 10.30 वाजता, बिअर बार परमिट रूम सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत व देशी दारू दुकान सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत असे वेळ असताना बिनधास्त रात्री उशिरापर्यंत ही दुकाने चालू असतात. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामात असल्याने अवैध देशी, विदेशी व गावठी दारू विक्री जोमात सुरू आहे. या कार्यालयात सुरक्षा रक्षक नियुक्‍त करून मनुष्यबळ वाढविण्याची मागणी होत आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तळेगाव विभागाकडे पूर्वीपासून सुरक्षारक्षक हे पद नाही. कार्यालयाच्या हद्दीतील अवैध देशी, विदेशी, गावठी दारू साठवण, विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. त्यातून कारवाईमध्ये जप्त केलेला मुद्देमाल ताब्यात घेत, तो कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात येतो.

– राजाराम खोत, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, तळेगाव.

Leave A Reply

Your email address will not be published.