अखेर कुसूर पठारावर “फिटे अंधाराचे जाळे…’

जानेवारीअखेर काम पूर्ण करण्याचे ठेकेदाराने दिले आश्‍वासन

टाकवे बुद्रुक – आंदर मावळातील कुसूर पठार, कांब्रे पठारावरील दुर्गम भागातील वीजपुरवठा करणारे खांब जमिनीवर पडले असल्याने येथील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत असल्याचे वृत्त दै. प्रभातने आठडाभरापूर्वी प्रसिद्ध केले होते. या वृताची दखल घेत महावितरण प्रशासन खडबडून जागे झाले. स्थानिक लोकप्रधिनीसमवेत घटनास्थळी प्रत्यक्ष भेट दिली.

या वेळी महावितरण अभियंता विजय जाधव यांनी दिलेल्या कामाच्या ठेकेदाराला घेऊन सद्यस्थितीत आडवे पडलेल्या खाबांची पूर्ण पाहणी केली. या वेळी शिवसेना तालुका प्रमुख राजु खांडभोर यांनी येथील नागरिकांची होणारी गैरसोय सध्या कोणत्या परिस्थिती गावकरी वास्तव्य करीत आहेत. याविषयी माहिती दिली जानेवारी अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन यावेळी संबंधित ठेकदाराने दिले.

देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटून गेली; परंतु आंदर मावळातील काही गावांच्या नशिबीचा अंधार अजून मिटला नाही. दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती या केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून आंदर मावळातील कुसूर पठारावरील आदिवासी बाधवांना वीज उपलब्ध करून देण्याचे काम सुरुवातीला युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले होते. यामुळे आदिवासी बांधवांना वीज येणार असा आशेचा किरण दिसत होता. परंतु ज्या खांबांवरुन ही वीज येणार आहे आणि ते खांबच जमिनीवर आडवे पडले असून, ग्रामस्थांच्या नशिबी अंधार कायम आहे.

आंदर मावळातील कुसूर पठार, काब्रे पठार या दुर्गम आदिवासी भागात आजपर्यंत वीज पोहचली नसल्याने तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूपच वेगाने धावत असलेल्या जगाच्या तुलनेत हा भाग मागे राहिला आहे. दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती या योजने अंतर्गत वीज पुरवठा करण्याचे प्रयत्न पहिल्यांदाच सुरू झाले. शिवसेना तालुका प्रमुखा राजू खांडभोर यांनी खासदारांकडे मागणी करुन या परिसरात दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेद्वारे वीज आणण्यासाठी पाठपुरावाही केला. केंद्र सरकारच्या या योजनेतून कामाला मंजुरीही मिळाली. सहा महिन्यांपूर्वी कामाला सुरुवातही झाली.

मात्र प्रत्येक कामाप्रमाणे या कामातही दिरंगाई डोईजड झाली. काम व्यवस्थित न झाल्याने वीज वाहिन्यांना भार पेलण्यासाठी लावण्यात आलेले 30 ते 35 खांब जमिनीवर आडवे पडले आहेत. परंतु काम काही गती घेत नव्हते.

अखेर यासंदर्भात दै. प्रभातने “खांब भूईसपाट, कुसूर पठार अंधारात’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले आणि प्रशासन हालले. दै. प्रभातच्या या बातमीचे कुसूर पठारवरील ग्रामस्थांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.