चिमुकल्यासह अपहरण करून आईचा खून करणाऱ्या महिलेला जन्मठेप

पुणे – पोलिओ डोस आणि अनुदान मिळवून देण्याचे अमिष दाखवून २५ दिवसांच्या मुलासह आईचे अपहरण करून खून करणाऱ्या महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. यासोबतच ७ हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.पी. आगरवाल यांनी सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

निकिता संजय कांगणे (वय 30, रा. रामटेकडी, हडपसर) असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. लक्ष्मी ऊर्फ पिंकी बालाजी जाधव (वय 19, रा. टाकळी, ता. देगलूर, जि. नांदेड) ही महिला माफीचा साक्षीदार बनली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी 13 साक्षीदार तपासले. त्यांना फिर्यादीच्या वकील ऍड. जेसिंता डेव्हिड यांनी आणि हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल आबासाहेब गायकवाड, चंद्रशेखर जाधव यांनी मदत केली. तीन महिलांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्या तिघींतर्फे ऍड. इब्राहिम शेख यांनी काम पाहिले. मधु रघुनंदन ठाकुर असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, तिचे पती रघुनंदन (वय 23, रा. वैदवाडी, हडपसर, मूळ. उत्तरप्रदेश) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

लक्ष्मी ही निकिता हिच्या घरी राहत असत. दोघींनी पोलिओ डोसच्या बहाण्याने मयताशी ओळख केली होती. फिर्यादीही त्यांना ओळखत होते. मुलाला पोलिओ डोस आणि अनुदान मिळवून देण्याच्या बहाण्याने मयत आणि मुलाला नेत त्यांचे अपहरण करण्यात आले. निकिता हीच्या घरात ठेवले. तिथे मयताच्या तोंडावर, चेहऱ्यावर लाल मिरची टाकण्यात आली. त्यावेळी ती ओरडू लागली. त्यावेळी कापडी गोळा तिच्या तोंडात कोंबण्यात आला. ओढणीने पाय बांधले. मच्छरदनीने गळा आवळून तिचा खून केला.

त्याच मच्छरदाणीत तिचा मृतदेह बांधून समोर राहणाऱ्या महिलेच्या पलंगाखाली टाकण्यात आला. तिचा मोबाईल अर्धवट फोडून पुरावा नष्ट करण्यात आला होता. यावर पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी ऍड. पाठक यांनी केली. न्यायालयाने खून, अपहरण आणि पुरावा नष्ट करण्याच्या कलमानुसार शिक्षा सुनावली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)