Imran Khan – पाकिस्तानातील निवडणूक आयोगाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याचा जो निर्णय घेतला होता, त्याला इम्रान यांनी दिलेले आव्हान लाहोर उच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहे. त्यामुळे आता इम्रान खान यांच्यासाठी सार्वत्रिक निवडणुकीत उतरण्याचे मार्ग बंद झाले आहेत.
इम्रान खान यांना संसदेच्या दोन मंतदारसंघातून निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी आणि आव्हान लवादाने दिलेला निर्णय लाहोर उच्च न्यायालयाने योग्य ठरवला आहे. तोशखाना प्रकरणात दोषी आढळल्यामुळे इम्रान खान यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला होता.
या प्रकरणात इम्रान खान यांना ३ वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. सरकारी भेटवस्तू आणि कर विषयक तपशील जाहीर न केल्याबद्दल त्यांच्यावर आरोप ठेवले गेले होते. एका अन्य मतदारसंघातील मतदार यादीमध्ये नाव नसल्यामुळे त्यांचा आणखीन एक उमेदवारी अर्ज देखील बाद ठरवण्यात आला आहे.