पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणी नोंदविण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून विद्यापीठाकडे 13 हजार 500 तक्रारी आल्या आहेत. त्यावर निर्णय घेण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली असून येत्या आठवड्याभरात अहवाल प्रशासनाकडे प्राप्त होणार आहे. त्यानंतर तक्रारींबाबत अंतिम निर्णय होणार आहे.
पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील संलग्न महाविद्यालयातील अडीच लाख विद्यार्थ्यांची ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देताना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विद्यापीठाने संकेतस्थळावर गुगल फॉर्म उपलब्ध करून दिला. परीक्षेबाबतच्या अडचणी विद्यार्थी गुगल फॉर्ममधून विद्यापीठाकडे पाठवू शकतात.
प्राप्त तक्रारींचे सहा प्रकारांमध्ये विभाजन केले आहे. लॉगिन न होणे, चुकीची प्रश्नपत्रिका मिळणे, प्रश्न किंवा पर्याय न दिसणे, पेपर सबमीट न होणे या तक्रारी गुगल फॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे दाखल केल्या.