बॅकलॉगचा निर्णय दोन दिवसांत घेणार
पुणे: बीए, एमए, बीएसस्सी, एमएसस्सी आणि बीकॉम, एमकॉम या पारपंरिक अर्थात अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाची परीक्षा होणार नसल्याची घोषणा राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी केली. त्याचप्रमाणे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्ष अथवा सत्राची परीक्षा घेतल्या जाणार नाहीत. या निर्णयास संबंधित शिखर संस्थेस मान्यता देण्याची शिफारस केली जाणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची इच्छा असेल, त्यांना परीक्षेस बसण्याची संधी दिली जाणार आहे.
सामंत यांनी फेसबुक लाइव्हद्वारे संवाद साधताना अंतिम वर्षाची परीक्षा होणार असल्याचे जाहीर केले. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्या संलग्नित महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या अंतिम सत्र अथवा अंतिम वर्षाची परीक्षा होणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास तसे त्यांच्याकडून लेखी स्वरुपात घेऊन विद्यापीठांनी योग्य तो निकाल जाहीर करावा. ज्यांना परीक्षा द्यायची असेल, तसे त्यांच्याकडून लेखी स्वरुपात घेऊन परीक्षेस बसण्याची संधी देण्यात यावी.
अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा कोणत्या महिन्यात घेता येऊ शकतील, याची करोना संसर्गाचा स्थानिक पातळीवर परिस्थितीचा विचार करून आणि संबंधित जिल्हाधिकारी यांच्याशी विचारमिनिमय करून विद्यापीठांनी निर्णय घ्यावा व त्यानुसार वेळापत्रक जाहीर करावे, असेही सामंत यांनी म्हटले आहे.
अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, व्यवस्थापनशास्त्र, वास्तुकला, प्लॅनिंग, संगणकशास्त्र, विधी (लॉ), शारीरिक शिक्षण व अध्यापन शास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्र अथवा वर्षाच्या परीक्षा घेता येणार नाहीत. त्या निर्णयास मान्यता देण्याची विनंती संबंधित व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिखर संस्थेस करण्यात येईल. त्याबाबत स्वतंत्रपणे कळवण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
व्यावसायिक व अव्यावायिक अभ्यासक्रमांतील ज्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना बॅकलॉग विषय राहिले आहेत, त्यांच्या विषयीचा परीक्षेसंदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू व संबंधित अधिकारी यांची शासनस्तरावर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे.
अंतिम वर्षाची विद्यार्थी संख्या
अव्यावसायिक अभ्यासक्रम – 7, 34, 516
व्यावसायिक अभ्यासक्रम – 2, 83,937