नवी दिल्ली: पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंडियन एअर फोर्सही चीनच्या कुठल्याही आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झाले आहे. आयएएफने आपली फायटर विमाने मोक्याच्या ठिकाणी फॉरवर्ड बेसेस आणि एअरफिल्डवर तैनात केली आहेत. एअर फोर्स प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी आज लेह आणि श्रीनगर या दोन एअर बेसला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला.
एअरफोर्स प्रमुखांनी आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये तयारीचा आढावा घेतला. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेच्या पलीकडे चीनने 10 हजार सैनिक जमा करुन ठेवले आहेत. सरकारी सूत्रांनी एएनआयला ही माहिती दिली. आरकेएस भदौरिया यांनी 17 जूनला लेहमधील त्यानंतर दुसऱ्यादिवशी 18 तारेखला श्रीनगरला भेट देऊन तिथल्या तयारीचा आढावा घेतला.
हे दोन्ही एअरबेस लडाखच्या जवळ आहेत. डोंगराळ भागात कुठलेही ऑपरेशन्स या बेसवरुन करता येऊ शकते. भारताला चीनवर वरचढ होण्याची संधी आहे, असे सूत्रांनी सांगितले. एअरफोर्सने सुखोई-30 एमकेआय, मिराज 2000 आणि जॅग्वार मोक्याच्या ठिकाणी तैनात केले आहेत. जिथून अत्यंत कमी वेळात उड्डाण करुन कुठलही ऑपरेशन करता येईल.
पूर्व लडाखमध्ये तैनात असलेल्या लष्कराच्या जवानांना तत्काळ आवश्यक सपोर्ट देण्यासाठी अपाची हेलिकॉप्टर सुद्धा तैनात करण्यात आली आहेत. अपाची ही अमेरिकन बनावटीची मिसाइलने सुसज्ज असलेली लढाऊ हेलिकॉप्टर्स आहेत. सैनिक तुकडया वेगाने पोहोचवण्यासाठी चिनूक हेलिकॉप्टर्सही सज्ज आहेत.