नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आज सकाळी पावणे सात वाजता पोखरण आर्मी रेंजवर वॉरहेड वापरुन ‘नाग’ या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची अंतिम यशस्वी चाचणी केली. चार किलोमीटर रेंज असलेले हे क्षेपणास्त्र खांद्यावरुन डागता येते. भारतीय लष्करामध्ये या क्षेपणास्त्राचा लवकरच समावेश केला जाणार आहे. पूर्व लडाख सीमेवर तणावाची स्थिती असताना, नाग क्षेपणास्त्राने चाचणीचा अंतिम टप्पा पार करणे, खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण तिथे दोन्ही देशांचे रणगाडे परस्परांच्या रेंजमध्ये आहेत.
India today successfully carried out the final trial of the DRDO-developed Nag anti-tank guided missile with a warhead. The test was carried out at 6:45 am at the Pokhran field firing ranges in Rajasthan.
— ANI (@ANI) October 22, 2020
हेलिकॉप्टरमधून डागल्या जाणाऱ्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी केल्यानंतर आज नाग क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. १९ ऑक्टोबरला बालासोर टेस्ट रेंजवर स्टँड ऑफ अँटी टँक मिसाइलची चाचणी करण्यात आली होती. या क्षेपणास्त्राद्वारे १० किलोमीटर अंतरावरील रणगाडा उडवता येऊ शकतो. भविष्यात लढाऊ हेलिकॉप्टरवर हे क्षेपणास्त्र बसवण्यात येईल. पण तीन दिवसापूर्वीची चाचणी जमिनीवरुन करण्यात आली व ती यशस्वी सुद्धा ठरली. नाग क्षेपणास्त्राची आजची दहावी चाचणी यशस्वी ठरली. त्यामुळे लष्करात या क्षेपणास्त्राचा समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे, असे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
डीआरडीओने मागच्या महिन्याभरापासून क्षेपणास्त्र चाचणीचा धडका लावला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला फक्त निर्भय या १ हजार किलोमीटर रेंज असलेल्या क्षेपणास्त्राच्या चाचणीत तांत्रिक अडथळा उदभवला होता. नेमका बूस्टरमध्ये कुठे बिघाड झाला होता, ते शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे. लवकरच निर्भय सबसॉनिक क्षेपणास्त्राची सुद्धा चाचणी होईल. नाग क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी होणे म्हणजे, चार किलेमीटरपर्यंतच्या अंतरासाठी भारताला आता इस्रायल, अमेरिकेकडून क्षेपणास्त्र आयात करण्याची गरज उरणार नाही.