पुणे -काही महिन्यांपूर्वी पुण्यात गाजलेल्या किडनी तस्करी प्रकरणाची चर्चा विधान परिषदेच्या अधिवेशनात झाली. या प्रकरणात संबंधितांवर मानवी अवयव तस्करी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात रुबी हॉल क्लिनिकमध्ये एका महिलेने पंधरा लाख रुपयांच्या बदल्यात किडनी दिली होती. मात्र, त्या महिलेला पैसे न मिळाल्याने तिने याची तक्रार पोलिसांत दिली. पोलिसांनी याबाबत तपास केला. वैद्यकीय शिक्षण विभाग, आरोग्य विभाग यांनी चौकशी समिती नेमली. हे प्रकरण रुबी हॉल क्लिनिकमध्ये घडल्याने त्यांचा अवयव प्रत्यारोपण करण्याचा परवाना तात्पुरता रद्दही करण्यात आला होता.
दरम्यान, याबाबत वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने त्यावेळी या किडनी प्रत्यारोपणाला परवानगी देणाऱ्या ससूनमधील विभागीय मान्यता समितीचे अध्यक्ष तथा तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना पदावरून दूर केले. तसेच हा गुन्हा आता आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी दिला आहे.
गरीबांना दोन दोन वर्ष वाट पाहूनही किडनी मिळत नाही; परंतु श्रीमंताना लाखो रुपये देऊन किडनी मिळते, ही गंभीर बाब आहे. तसेच ससूनच्या सरकारी रुग्णालयातील रॅकेटशी संबंध असलेल्यांवर मानवी अवयवांच्या तस्करी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून अटक करा, अशी मागणी शिंदे यांनी केली. संबंधितांना केवळ “साईड पोस्टिंग’ देण्यात आली आहे असाही उल्लेख त्यांनी कुणाचेही नाव न घेता केला. गरीबांना देखील किडनी मिळेल, असे सरकारने पाहायला हवे, अशी मागणीही शिंदे यांनी यावेळी केली.