मंचर -पुणे-नाशिक रस्त्यावर मंचरजवळील भोरवाडी येथे बायपास मार्गावर रविवारी (दि. 1) दुपारी तीन वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत वाहतूक कोंडीच्या समस्येला प्रवाशांना तोंड द्यावे लागले. मंचर पोलिसांनी वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले असले तरी वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने सुमारे दोन ते अडीच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या.
रविवार असल्यामुळे सार्वजनिक सुट्टी आणि नववर्षाचे स्वागत तसेच कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी नाशिक, अकोले, जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव मुरबाड, कल्याण परिसरातून मोठ्या संख्येने वाहने आल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. तसेच भोरवाडी बायपास येथे मंचर गावातून येणारा रस्ता तसेच नवीन बायपास असे दोन्ही रस्ते एकत्र झाल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली. दुपारी तीन वाजल्यानंतर वाहतूक कोंडी हळूहळू वाढत गेली. सायंकाळी सात वाजेपर्यंत प्रवासी हैराण झाले.
अपूर्ण कामांबाबत अधिकाऱ्यांना सुनावले
या वाहतूक कोंडीतही पुणे नाशिक महामार्गाचे समन्वय दिलीप मेदगे अडकले. त्यांनी हमरस्ता अधिकाऱ्यांना फोन करून रस्त्याच्या अपूर्ण कामाबाबत सुनावले. अधिकाऱ्यांनी स्वयंसेवक वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी पाठविले. त्यानंतर हळूहळू वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत झाली. भोरवाडी तांबडेमळा येथे उड्डाणपुलाची आवश्यकता आहे. याबाबत तातडीने कार्यवाही झाली पाहिजे, अशी मागणी प्रवाशांसह वाहन चालकांनी पुणे नाशिक महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांच्याकडे केली.