नेवासा – नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे (ता.सिन्नर) येथील क्रांतिवीर भागोजी नाईक विजयी स्मारक राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) गटाचे आमदार मानिक कोकाटे यांनी भिल्ल समाजाला विश्वासात न घेता बेकायदा उद्धवस्त केल्याप्रकरणी आमदार कोकाटे यांच्यावर अनूसुचित जाती – जमाती कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नेवासा तहसिल कार्यालयासमोर आदीवासी प्रबोधन सेवा संघ प्रणित तंट्या बिग्रेडच्यावतीने अमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.
नेवासा तहसिल कार्यालयासमोर सुरु करण्यात आलेल्या उपोषणात तंट्या ब्रिगडेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर भंगड,प्रदेशाध्यक्ष विठ्ठल माळी,सुनिल मोरे यांच्यासह नितीन जाधव,अनिल पवार,विश्वनाथ जाधव,रामदास बेळे (महाराज),बहिरु माळी,बबन माळी या उपोषणात सहभागी झाले आहेत.
नेवासा तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की,क्रांतिवीर भागोजी नाईक यांचे स्मारक भिल्ल समाजाला विश्वासात न घेता उद्धवस्त केल्यामुळे समाजात संतापाची लाट पसरली असून आमदार कोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
तसेच एकात्मिक आदीवासी प्रकल्प राजूर मार्फत देण्यात येणारे अनुदान योजना अकोले सोडून इतर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आदीवासी बांधव असतांनाही योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे चौकशी करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आलेली असून नेवासा खुर्द येथील गोरक्षण संस्था येथील गायरान जमीन गट क्रमांक ३५/१ व ३५ /२ मधील पिक पाहणी केस नंबर ३ अहवाल मिळण्याची मागणी केली आहे तसेच नेवासा खुर्द नागझिरी जवळ असलेल्या वन जमीन गट नं.४८/११ मधील किसनगिरी पादुका,गुलाम महाराज समाधी,देवस्थान व पिकांची पाहणी स्थळ निरिक्षण, पंचनामा,जबाब होण्याबाबत तसेच आदीवासी बांधवांना शेतीसाठी विद्युत रोहिञ मिळणेबाबत व नविन रेशनकार्डावर धान्य मिळण्याबाबत दखल घेण्याची मागणी तंट्या ब्रिगेडने तहसिलदारांना केलेल्या निवेदनात केली असून मागण्या मान्य होईपर्यंत उमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे या उपोषणाला इंदिरा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे व नेवासा तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पटारे यांनी भेट देवून पाठिंबा दिला आहे.