नवी दिल्ली – परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या ( एफआयआय) माध्यमातून परदेशातील काही गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत आहेत. या या परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीवरील लाभ नेमका कोणाला होणार आहे याची माहिती संस्थागत गुंतवणूकदारांना सेबीकडे सादर करावी लागणार आहे. या नियमाची अंमलबजावणी एक फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
याबाबत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी औपचारिक प्रतिक्रिया व्यक्त केली नसली तरी सध्या परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून भारतीय शेअर बाजारात होत असलेली विक्री हे या नव्या नियमाचे कारण असू शकते. मात्र सेबीच्या सूत्रांनी सांगितले की, सेबीच्या नव्या नियमावलीचा परदेशी संस्थागत गुंतवणूकदारावर फारसा परिणाम होणार नाही.
त्याचबरोबर नवे नियम या गुंतवणुकीवर परिणाम करू शकणार नाहीत. आम्ही फक्त या गुंतवणुकीचा फायदा नेमका कोणाला होणार आहे याची शहानिशा करणार आहोत असे म्हटले आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या माध्यमातून ज्या कंपन्या गुंतवणूक करतात आणि ज्यांची औपचारिक ओळख जागतिक पातळीवरील नियमावलीत झाली आहे त्यांच्याबद्दल माहिती देण्याची गरज नाही. मात्र इतर गुंतवणूकदारांची माहिती देण्याची गरज असल्याचे सेबीने म्हटले आहे.
अमेरिकेतील व्याजदर उच्च पातळीवर असल्यामुळे परदेशी गुंतवणूकदार सध्या विक्री करीत असल्याचे वातावरण असून गेल्या चार सत्रात या गुंतवणूकदारांनी तब्बल 27 हजार कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे. ज्या परदेशी फंडाचे नियमन कोणाकडूनही केले जात नाही अशा फंडाची गुंतवणूक जर परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या माध्यमातून येत असेल तर त्याला सेबीने हरकत घेतली आहे.
त्याचबरोबर या परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना सध्याच्या परिस्थितीत त्यांच्याकडील गुंतवणूकदारांची ओळख न दाखविता आपल्या व्यवहार फेरबदल करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे असेही सेबीकडून स्पष्ट करण्यात आले. यासाठी आणखी सहा महिन्याची मुदत वाढ मिळू शकते. त्यामुळे या गुंतवणूकदाराने भांबावूून जायची गरज नाही असे स्पष्ट करण्यात आले.
काळा पैसा राखण्यासाठी
मात्र काळा किंवा अवैध पैसा भारतीय शेअर बाजारात येऊ नये याची काळजी म्हणून सेबीला या नव्या नियमाची अंमलबजावणी करावी लागणार असल्याचे सूचित करण्यात आले. भारतीय शेअर बाजारामध्ये परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची 20% गुंतवणूक आहे. या गुंतवणूकदारांच्या व्यवहारावर निर्देशांकात अस्थिरता निर्माण होत असते.