पिंपरी -अजंठानगर येथील एका सोसायटीमध्ये दोन गटात कोयता, घन, रॉड, लाकडी बांबूने तुंबळ मारामारी झाली. सोसायटीच्या पार्किंगमध्ये थांबण्यावरुन सुरु झालेल्या वादात जबरदस्त हाणामारी झाली असून दोन्ही गटांनी निगडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना शनिवारी (दि. 9) रात्री अजंठानगरमध्ये घडली.
बाबासाहेब गोविंद कांबळे (वय 50, रा. अमृतकृपा हाऊसिंग सोसायटी, अजंठानगर) यांनी रविवारी (दि. 10) फिर्याद दिली आहे. दिपक कांबळे (वय 22), स्वप्निल भिसे (वय 20), गोपाळ कांबळे (वय 23), महावीर कांबळे (वय 25), सुरेश श्रावण कांबळे (वय 45), शिवा येतनाळकर (वय 20), रामा कोळी (वय 22), लता कांबळे (वय 35) अन्य चार अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिपक आणि स्वप्निल हे सोसायटीच्या पार्किंगमध्ये विनाकारण थांबले होते. फिर्यादी हे सोसायटीचे चेअरमन आहेत. “महिला पाणी भरत आहेत, येथे थांबू नका’. असे फिर्यादी बाबसाहेब कांबळे यांनी आरोपींना सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी दीपक याने आपल्या अन्य साथीदारांना बोलावून आणले.
सर्व आरोपींनी फिर्यादी बाबासाहेब यांचा मुलगा आनंद आणि बाळा या तिघांना मारहाण केली. तसेच फिर्यादी व त्यांच्या मुलाला कोयता, लोखंडी रॉड, हातोडा आणि पालघनने मारहाण केली. या भांडणात बाबासाहेब आणि त्यांच्या मुलाचे डोके फुटले. आरोपीने फिर्यादी यांची रिक्षा आणि मोटारीच्या काचा फोडून नुकसान केले.
दीपक सुरेश कांबळे (वय 19) यांनी परस्पर विरोधात फिर्याद दिली आहे. बाबासाहेब गोविंद कांबळे, अविनाश बनसोडे, आनंद कांबळे, प्रतीक कांबळे, विजय ठोसर, अमोल साबळे, क्रिश गायकवाड, ईश्वर, बाबा कांबळे यांची भाची राधा सरोदे, पूजा साबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादी, त्यांचा भाऊ महावीर, राजेंद्र विसापूरे, आई यांना कोयता, लोखंडी रॉड, लाकडी बांबूने तसेच चपलेने मारहाण केली.