शिक्रापूर -वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील दोन कुटुंबीयांत शेतातील पिकांना दिलेल्या पाण्याच्या वादातून भांडणे होऊन दोन गटात हाणामारी झाली. यात नवजात बालकाच्या मातेला निर्दयीपणे मारहाण केली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नऊ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
आकांक्षा ललित कटके (रा. चांबळी, ता. पुरंदर) व सुनील भाऊसाहेब शिवले (रा. वढू बुद्रुक, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत. पोलिसांनी सुनील भाऊसाहेब शिवले, सुमन भाऊसाहेब शिवले, भाऊसाहेब सोपान शिवले, बंडू (पूर्ण नाव माहित नाही) तसेच पंढरीनाथ ऊर्फ बबू सोपान शिवले, आयुष ऊर्फ सोन्या पंढरीनाथ शिवले, मोहिनी पंढरीनाथ शिवले, छाया पंढरीनाथ शिवले (सर्व रा. वढू बुद्रुक),
तसेच आकांक्षा ललित कटके यांच्याविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. पंढरीनाथ शिवले व सुनील शिवले यांची शेतजमीन शेजारी शेजारी आहे. त्यांच्या शेतातील पिकांना दिलेल्या पाण्यावरून दोघांच्या कुटुंबीयांमध्ये वाद झाला. दरम्यान, दोन्ही कुटुंबीयांमध्ये हाणामारी होत बॅटने हाणामारी करण्यात आली आहे. सुनील शिवले यांनी माझा मोठा मुलगा सरपंच आहे तुम्हाला जेलमध्येच सडवतो, अशी धमकी दिल्याचा आरोप आकांक्षा कटके हिने केला आहे.