अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा

2 सीआरपीएफ, 3 एसआरपीएफ तर 4 आरसीपी टीम सज्ज

पुणे – लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यात पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी (दि. 29) होणाऱ्या मतदानासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून 2 हजार 500 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच 2 सीआरपीएफ, 3 एसआरपीएफ यासह 4 आरसीपी टीमलाही पाचारण करण्यात आली आहे. दरम्यान, दोन्ही मतदारसंघातील मतदानप्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिरूरमध्ये 2 हजार 504 मतदान केंद्र असून, 31 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. तर मावळमध्ये 2 हजार 296 मतदान केंद्र असून, 47 केंद्र संवेदनशील आहे. दरम्यान, मावळमधील मागील पार्श्वभूमी पाहता याठिकाणी पोलिसांनी अधिकचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच स्पेशल स्ट्रायकिंग फोर्सही याठिकाणी तैनात करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या काळात 1 कोटी 10 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. आचारसंहिता भंगाचे सात गुन्हे दाखल असून, 70 हजार लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांची धडक कारवाई
आतापर्यंत अडीच हजार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, 1 हजार 800 जणांविरुद्ध 107 कलमान्वये कारवाई केली आहे. 460 जणांविरुद्ध 144 तर 125 जणांविरुद्ध 100 कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. 8 टोळ्यांना तडीपार केले आहे. आत्तापर्यंतच्या कारवाईमध्ये 12 पिस्टल, 1 रायफल, 25 काडतूस, 10 कोयते, 2 रिव्हॉल्वर, 18 तलवारी, 3 गुप्ती, 2 बंदुक, 40 छरे, 54 डेटोनेटर, 5 चॉपर, 2 भाले आणि एक कुकरी असा एकूण 40 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

काही मतदारसंघ रायगड जिल्ह्यात येतात. त्यामुळे तेथील निवडणूक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून मतदानप्रक्रिया शांततेत पार पाडण्यात येणार आहे. ईव्हीएममध्ये काही गोंधळ झाला तर तातडीने बदलण्यात येणार आहे. तसेच मतदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत केंद्र असणार आहेत. दरम्यान, प्रचार बंद झाल्यानंतर बाहेरचा व्यक्ती मतदारसंघात आढळून आल्यास त्याच्यावर त्वरीत कारवाई करण्यात येणार आहे.

नवल किशोर राम, जिल्हाधिकारी, पुणे

मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिरूर तालुक्‍यातील काही भागात संपर्कासाठी अडचणी येत असल्यामुळे घोडेगाव या भागात सॅटलॅट फोनचा वापर करण्यात येणार आहे. कोठेही गोंधळ होऊ नये, यासाठी 13 ठिकाणी चेक पोस्ट असून, दोन दिवसांत चेक पोस्टची संख्या वाढविण्यात येणार आहे.

संदीप पाटील, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.