प्रचार हुश्‍श..! संपला एकदाचा लोकसभेचा

आता मतदानाची प्रतीक्षा ः शेवटच्या दिवशी पदयात्रा, रॅली, सभांवर जोर

सोशल मीडियाचा प्रभावी वापर
उमेदवारांनी प्रचारासाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर केला. व्हॉट्‌सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, मेसेंजर आदींच्या माध्यमातून व्हिडिओ, ऑडिओ व लिखित स्वरूपात प्रचार केला. त्याशिवाय, भ्रमणध्वनीवर व्हाईस कॉल, वैयक्तिक मेसेज पाठवुनही प्रचार करण्यात आला. आता मतदारराजा कोणाला साथ देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पिंपरी – मावळ लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुक्रवार (दि. 27) शेवटचा दिवस उमेदवारांच्या दृष्टीने मोठा धावपळीचा ठरला. पदयात्रा, वाहन रॅली, कोपरा सभा, बूथ पदाधिकाऱ्यांची बैठक तसेच मतदारांच्या वैयक्‍तिक गाठीभेटी घेऊन प्रचाराचा समारोप करण्यात आला. सर्वच पक्षांनी आज दिवसभर धावपळ करत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. सायंकाळ होताच उमेदवारांसोबत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांनी हुश्‍श.. संपला एकदाचा लोकसभेचा प्रचार असे म्हणत असा सुस्कारा सोडला. तर, पिंपरी-चिंचवडपासून कर्जत, पनवेल, उरण आदी पट्ट्यात प्रचाराची सुरू असलेली धामधूम संपल्याने उमेदवारांनीही क्षणभर विसावा घेतला.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरवात झाली. तथापि, ज्या उमेदवारांची नावे निश्‍चित होती त्यांनी त्या आधीपासूनच प्रचार सुरू केला होता. मावळसाठी सोमवारी (दि. 29) मतदान होत आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या 21 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी कर्जत, उरण परिसरात आज दिवसभरात पदयात्रा आणि “रोड शो’ द्वारे मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. पार्थ यांचे बंधू जय पवार यांनी चिंचवडगावातील महासाधू मोरया गोसावी मंदिरापासून चापेकर चौकापर्यंत रॅली काढली. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये विविध भागांत रॅली, पदयात्रा काढल्या. विविध समाजाचे स्वतंत्र मेळावे झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारासाठी पिंपरी-चिंचवड शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. देहूरोड येथील विकासनगरपासून किवळे, रावेत, वाल्हेकरवाडी, चिंचवड, काळेवाडी, रहाटणी, वाकड मार्गे थेरगाव गावठाण येथे रॅलीचा समारोप झाला. शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, आमदार लक्ष्मण जगताप, राहुल कुल आदी रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांच्या प्रचारासाठी खोपोली आणि उरण परिसरात आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष अकील मुजावर यांच्या सभा झाल्या. पिंपरी-चिंचवड शहरात स्थानिक कार्यकर्त्यांनी रिक्षांच्या माध्यमातून तसेच कोपरा सभा घेऊन प्रचार केला. बहुजन समाज पार्टीचे उमेदवार ऍड. संजय कानडे यांच्या प्रचारासाठी पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा परिसरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी मावळ, पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील बुथ पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच, मतदानाच्या दिवशी प्रमुख मतदान केंद्रांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.