लोंढे हल्ला प्रकरणातील तपास अधिकारी बदलण्याचे आदेश

पिंपरी – चिंचवड येथील गणेश लोंढे हल्ला प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा, अशी मागणी मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी या मागणीची दखल घेत तपास अधिकारी बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कॉंग्रेसचे माजी नगरसेवक गणेश लोंढे यांच्यावर 4 एप्रिल रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास चिंचवड येथील काकडे पार्कमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी गणेश घोलप, आकाश घोलप (दोघे रा.तानाजीनगर, चिंचवड) व सुमित लव्हे (रा.काळेवाडी) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आकाश घोलप यास पोलिसांनी अटक केली आहे. लोंढे हे कामानिमित्त त्यांच्या मोटारीतून चिंचवड येथे गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढवला होता. या गुन्ह्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक नंदकुमार कदम हे लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने आरोपी मोकाट आहेत.

मातंग एकता आंदोलन संघटेनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्‍त पद्मनाभन यांना भेटून तपासाबाबतची सद्यस्थिती सांगितली. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत जाधव यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) विश्‍वजित खुळे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.