गुजरातमधील कॉंग्रेसच्या पाचव्या आमदाराचा राजीनामा

राज्यसभेवर दोन सदस्य पाठवणे बनले अवघड
गांधीनगर : गुजरातमधील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसला सोमवारी आणखी एक धक्का बसला. त्या पक्षाच्या पाचव्या आमदाराने विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

त्यामुळे भाजपशासित गुजरातमधून राज्यसभेवर 2 सदस्य पाठवणे कॉंग्रेससाठी अधिकच अवघड बनले आहे. गुजरातमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या 4 जागांसाठी 26 मार्चला निवडणूक होणार आहे.

भाजपने 3 तर कॉंग्रेसने 2 उमेदवार रिंगणात उतरवल्याने निवडणूक अटळ बनली आहे. अशातच कॉंग्रेसला लागलेल्या गळतीमुळे त्या पक्षासाठी दोन्ही जागा जिंकून आणणे जड जाणार आहे. गुजरात विधानसभेचे एकूण संख्याबळ 182 इतके आहे. आता 5 आमदारांच्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेसचे संख्याबळ 68 पर्यंत खाली आले आहे.

राज्यसभा निवडणुकीतील दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कॉंग्रेसला विधानसभेत 72 मते मिळवणे आवश्‍यक आहे. सत्तारूढ भाजपचे 103 आमदार आहेत. सध्या विधानसभेतील 2 जागा रिक्त आहेत.

अपक्ष आणि इतर पक्षांचे मिळून 4 आमदार आहेत. त्यांना गुजरातमधील घडामोडींमुळे राज्यसभा निवडणुकीत मोठे महत्व प्राप्त होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.