सरकारने मोठ्या कर्ज बुडव्यांची नावे लपवली – राहुूल गांधींचा आरोप

Madhuvan

लोकसभेत उपस्थित केला विषय

नवी दिल्ली – देशातील विविध बॅंकांची कर्ज बुडवणाऱ्या 50 सर्वात मोठ्या कर्जबुडव्यांची यादी जाहींर कधी करणार असा प्रश्‍न आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत विचारला. त्यावर राहुल गांधी यांनी सरकारला पुरवणी प्रश्‍न विचारण्यास सुरूवात केली तेव्हा सभापतींनी आपल्याला पुरवणी प्रश्‍नच विचारू दिले नाहीत असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की लोकसभेत पुरवणी प्रश्‍न विचारण्याचा सदस्याला अधिकार असतो पण आपल्याला पुरवणी प्रश्‍न विचारण्यास अडथळा आणला गेला, खासदार म्हणून आपल्याला जो अधिकार होता तो हिरावला गेला आहे असे त्यांनी म्हटले आहे. देशातील मोठ्या कर्ज थकबाकीदारांची किंवा जाणिवपुर्वक ज्यांनी कर्ज बुडवली आहेत अशा 50 मोठ्या लोकांची यादी जाहीर करण्यास सरकार का घाबरते आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

तत्पुर्वी लोकसभेत बोलताना ते म्हणाले की देशातील बॅंकांची कर्ज बुडवून जे लोक विदेशात फरारी झाले आहेत त्यांना भारतात परत आणले जाईल अशी घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. या कर्ज बुडव्यांची नावे सरकाराने जाहीर केली पाहिजेत अशी मागणी मी केली पण त्याला सरकारने कोणतेही उत्तर दिले नाहीं. मला ही 50 बडी नावे समजली पाहिजेत अशी मागणी त्यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासात केली. त्यांना उत्तर देण्यास अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर हे उठले असता कॉंग्रेस सदस्यांनी त्यांना आक्षेप घेतला.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीच या प्रश्‍नांवर उत्तरे दिली पाहिजेत अशी मागणी कॉंग्रेसकडून केली गेली.पण सभापतींनी हा आक्षेप फेटाळून लावला. त्यामुळे ठाकुर यांनी राहुल गांधींच्या प्रश्‍नाला उत्तर देताना ही कर्जे कॉंग्रेस सरकारच्याच काळात घेतली गेली आहेत असे सांगत यातील संबंधीतांची यादी वेबसाईटवर उपलब्ध आहेत असे त्यांनी नमूद केले. त्यानंतर राहुल गांधी यांनी या अनुषंगाने पुरवणी प्रश्‍न विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी आपल्याला अडथळा आणून आपला अधिकार नाकारला गेला असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.