लोणी काळभोर -करोनाच्या उपचारानंतर घऱी आलेल्या लोणी काळभोर येथील एका माजी सदस्याचे स्वागत विनामास्क व डीजेच्या तालावर, सोशल डिस्टन्सिंग न पाळता करणाऱ्या नातेवाइकांना भोवले आहे. लोणी काळभोर पोलिसांनी रुग्णासह, त्याचे स्वागत करणाऱ्या पंधराहून अधिक नातेवाइकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे माजी सदस्यांना लागण झाली होती. त्यांच्यावर दहा दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ते बुधवारी (दि.1) सायंकाळी घऱी परतले होते. या स्वागताचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
आता विवाह सोहळा, स्मशानभूमीवर वॉच
पोलीस निरीक्षक सूरज बंडगर म्हणाले की, पूर्व हवेलीमधील मंगल कार्यालयात होणाऱ्या विवाह सोहळ्यात पन्नासहून अधिक नातेवाइकांची गर्दी होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. शुक्रवारपासून पूर्व हवेलीमधील कार्यालयात होणाऱ्या विवाह सोहळ्यावर पोलीस पाटील, खबरे व पोलिसांमार्फत लक्ष ठेवले जाणार आहे.
तसेच अंत्यसंस्कार व दशक्रिया विधीदरम्यानही अधिक नागरीक जमत असल्याचे लक्षात आल्याने स्मशानभूमीवरही ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस वॉच ठेवणार आहेत. गर्दी दिसल्यास नागरिक लोणी काळभोर पोलिसांना माहिती देऊ शकतात. माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील.