FIFA WorldCup 2022 Argentina vs France Final Match – कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना गतविजेता फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात लुसेल स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्याच्या शेवटच्या क्षणी पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा ४-२ अशा फरकाने पराभव करत ३६ वर्षानंतर फिफा विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ २-२ अशा बरोबरीत राहिले. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत पोहोचला. याअगोदर दोन्ही संघांनी फिफा विश्वचषक ही स्पर्धा दोनदा जिकंलेली आहे. गतविजेत्या फ्रान्सने १९९८ आणि २०१८ मध्ये विजेतेपद जिंकले होते. तर दुसरीकडे अर्जेंटिनाने १९७८ आणि १९८६ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यात यश मिळवले होते.
BANvsIND | टीम इंडियाकडून बांगलादेशचा मोठा पराभव; कुलदीप यादवची चमकदार कामगिरी
पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाचा दबदबा राहिला
सामन्यात कर्णधार लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्याने २३व्या मिनिटाला पेनल्टीवर पहिला गोल केला. फ्रान्सच्या उस्माने डेम्बेलेने पेनल्टी बॉक्समध्ये अर्जेंटिनाच्या एंजल डी मारियाला खाली पाडल्याने त्याची चूक पाहून रेफ्रींनी अर्जेंटिनाला पेनल्टी दिली होता. या संधीवर कर्णधार मेस्सीने कोणतीही चूक न करता अचूक गोल मारला. त्यानंतर ३६व्या मिनिटाला एंजल डी मारियाने संधी मिळताच गोल मारला. फ्रान्सच्या उपमेकानो याला चेंडूवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याचवेळी मेस्सीने मॅकअलिस्टरकडे चेंडू पास केला. मॅकअलिस्टरने चेंडू डी मारियाकडे पास केला. डी मारियाने कोणतीही चूक न करता चेंडू गोलमध्ये टाकला आणि अर्जेंटिनाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या हाफमध्ये गतविजेत्या फ्रान्सची बाजू अर्जेंटिनासमोर अत्यंत कमकुवत जाणवली.
दुसऱ्या हाफमध्ये एम्बाप्पेच्या आक्रमक खेळीने फ्रान्स बरोबरीत
पहिल्या हाफ टाईममध्ये अर्जेंटिनाने अतिशय आक्रमक खेळ दाखवला. त्यामुळे फ्रान्सच्या बचावपटूंची चांगलीच झोप उडाली होती. अर्जेंटिनाच्या खेळाडूंचा आणि कर्णधार मेस्सीचा खेळ पाहता ते विजेतेपदाची बाजी मारतील असे वाटत होते. मात्र, फ्रान्सने सामन्यात पुनरागमन करत सलग दोन गोल केले आणि अर्जेंटिनाला लागोपाठ धक्के दिले. फ्रान्सचा युवा स्टार खेळाडू एम्बाप्पेने ८०व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर पहिला गोल केला आणि शांत बसलेल्या फ्रान्सच्या चाहत्यांचा जोरदार जल्लोष सुरु झाला. एम्बाप्पेने पुढच्याच मिनिटाला दुसरा गोल करत सामना फिरवला. एकवेळ सामन्यात पिछाडीवर असलेल्या गतविजेत्या फ्रान्सने अवघ्या दोन मिनिटाच्या आत सामन्यात बरोबरी साधली.
अर्जेंटिना आणि फ्रान्सने दमदार खेळ केल्याने सामन्याने अतिरिक्त वेळ गाठली. निर्धारित ९० मिनिटांच्या खेळात सामना २-२ असा बरोबरीत राहिला. त्यानंतर दोन्ही संघासाठी अतिरिक्त वेळेत १५-१५ मिनिटांच्या दोन हाफचा खेळ सुरु झाला. यानंतरही पुढील ३० मिनिटांमध्ये सामना बरोबरीत राहिला, तर पेनल्टी शूटआऊटमध्ये विजेत्याचा निर्णय घेतला जाईल. मात्र, मिळालेल्या अतिरिक्त वेळेत अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने १०८व्या मिनिटाला चेंडू गोलपोस्टमध्ये मारला. या गोलमुळे अर्जेंटिनाच्या संघाने सामन्यात ३-२ अशी आघाडी घेतली. यानंतर सामान्यांच्या ११८व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत फ्रान्सच्या एम्बाप्पेने गोल मारला आणि सामना पुन्हा ३-३ अशा बरोबरीत आला. त्यामुळे अतिरिक्त वेळेतही निकाल लागला नाही म्हणून सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला.
ARGENTINA ARE WORLD CHAMPIONS!! 🇦🇷#FIFAWorldCup | #Qatar2022
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 18, 2022
पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने मारली बाजी
अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये आक्रमक पवित्र घेतला आणि फ्रान्सचा ४-२ असा पराभव केला. अर्जेंटिनाने तब्बल ३६ वर्षांनंतर या सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. त्यांनी १९७८ आणि १९८६ नंतर आता तिसऱ्यांदा फिफा विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
🇦🇷👑 pic.twitter.com/5OW8L0mGrS
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 18, 2022