नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) कोव्हिड-19 संसर्गाच्या साथीमुळे भारतात होणारी 17 वर्षांखालील महिलांची विश्वचषक फुटबाॅल स्पर्धा रद्द केली आहे आणि 2022 मध्ये होणाऱ्या स्पर्धेचे यजमानपद भारतालाच दिले आहे, त्यामुळे भारत आता 2022 मध्ये फिफा 17 वर्षाखालील महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवेल.
दुसरीकडे कोस्टा रिका हा देश 20 वर्षाखालील महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवेल. ही स्पर्धा सुध्दा 2020 मध्ये होणार होती मात्र कोव्हिड-19 मुळे रद्द करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) जगभरातील कोव्हिड-19 संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर 17 वर्षांखालील महिलांची विश्वचषक फुटबाॅल स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. त्यामुळे यजमानपद भूषविण्यासाठी भारताला आणखी दोन वर्षे वाट पहावी लागणार आहे.
दरम्यान,17 वर्षांखालील महिलांची विश्वचषक फुटबाॅल स्पर्धा ही नोव्हेंबर-2020 मध्ये भारतात होणार होती. मात्र कोव्हिड-19 ची परिस्थिती पाहता ही स्पर्धा 2021 मध्ये फेब्रुवारी-मार्चपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा स्थितीचा आढावा घेतला असता आणखी काही काळ विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकणे शक्य नसल्याने अखेर ही स्पर्धा रद्द केल्याचे फिफाने स्पष्ट केले.