पुणे – सुट्टीनिमित्त खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिक, बेशिस्त वाहतूक आणि अतिक्रमणांमुळे शहराच्या मध्यवर्ती रस्त्यांवर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी झाली आहे. मंडई चौकासह लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, आप्पा बळवंत चौक, टिळक रस्ता गजबजला होते. यामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिक कोंडीत अडकल्याचे दिसून आले.
मध्यवर्ती भागात कापड आणि सराफा दुकाने मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे हा भाग सातत्याने गजबजलेला असतो. दिवाळीत या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अनेक ठिकाणी पदपथाची रुंदी वाढविण्यात येत असल्याने रस्ता अरुंद होऊन कोंडीत वाढ होत आहे. शुक्रवारपाठोपाठ शनिवारी खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे दोन दिवस वाहतूक पोलिसांना कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. दरम्यान, मंडई परिसर, आप्पा बळंवत चौक या परिसरात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, या तुलनेत पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने वाहने रस्त्यावर उभी केली जातात.
चारचाकी वाहने, पीएमपीमुळे कोंडीत भर
ऐन दिवाळीच्या सणात पावसाची स्थिती असल्याने अनेक नागरिक चारचाकी वाहने घेऊन बाहेर पडत आहेत. वाहनांची वाढती संख्या आणि पार्किंगसाठी अपुरी जागांमुळे वाहनचालकांकडून जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने लावली जात आहेत. विशेषतः मंडई पसिरातील रस्त्यांवर चारचाकी वाहने घेऊन आल्यानंतर कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते. तर, थांब्यांवरील पीएमपी बसेसमुळेही कोंडी वाढत आहे.