दोहा :- फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील मंगळवारी झालेल्या डेन्मार्क व ट्युनिशिया यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. या निकालामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला. या सामन्याला प्रारंभ झाल्यावर दोन्ही संघांनी एकमेकांचा बचाव भेदण्याचा सातत्याने प्रयत्न केला मात्र, त्यांना यश आले नाही.
पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत संपला. दुसऱ्या हाफमध्ये ट्युनिशियाचा स्टार फॉरवर्ड खेळाडू इस्साम जेबाली याने गोल करण्याचा एक अफलातून प्रयत्न केला होता.
मात्र, डेन्मार्कचा गोलरक्षक कॅस्पर शेमायकल याने सुरेख बचाव करत हा प्रयत्न अपयशी ठरवला. यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्याचे केलेले सर्व प्रयत्न फोल ठरले व सामना गोलशून्य बरोबरीतच संपला.
#FIFAWorldCup2022 : सौदी अरेबियाचा अर्जेन्टिनावर सनसनाटी विजय
अमेरिकन पत्रकाराला रोखले
कतारमध्ये असलेल्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे अमेरिकेचे पत्रकार ग्रॅंट व्हाएल यांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्यापासून रोखले गेले. त्यांनी इंद्रधनुष्याचे चित्र असलेला टी-शर्ट परिधान केला होता व त्यातून कतारमधील एका नियमाला हरताळ फासला जाइल असा संदेश देण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत व्हाएल यांना काही काळ कोठडीतही ठेवले गेले. त्यानंतर टी-शर्ट बदलण्यास सांगितले गेले. आता कतार सरकारवर मोठी टीका होऊ लागली आहे.