दोहा – फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत (Saudis shock Messi’s Argentina with sensational 2-1 win) मंगळवारी धक्कादायक निकाल लागला. कमकुवत समजल्या जात असलेल्या सौदी अरेबियाने बलाढ्य अर्जेन्टिनाचा 2-1 असा पराभव केला व सनसनाटी निकालाची नोंद केली. गोल साकारण्याची सुरुवात जरी अर्जेन्टिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने केली असली तरीही सौदीच्या सालेह अलसेहरी व सालेम अल्दवसारी यांनी आपल्या संघाला विजय मिळवत ही मोहीम यशस्वी ठरवली.
या सामन्यात पहिल्या हाफमध्ये अर्जेन्टिनाचा संघ विजेत्यासारखाच खेळला. जागतिक क्रमवारीतील अग्रेसर खेळाडू लिओनेल मेस्सीने 10 व्या मिनिटाला सौदीचा बचाव भेदला व अफलातून गोल केला. सुरुवात तर थाटात झाली होती. मात्र, दुसरा हाफ सुरू झाला आणि अर्जेन्टिनाचा संघ एखाद्या सामान्य क्लब दर्जाच्या संघासारखा खेळताना दिसला.
त्यांना त्यानंतर एकदाही सौदीचा बचाव भेदता आला नाही. उलट या हाफमध्ये 48 व्या मिनिटाला सालेह अलसेहरीने गोल केला व संघाला बरोबरी साधून दिली. यानंतर पाचव्याच मिनिटाला सालेम अल्दवसारीने सामन्याला कलाटणी देणारा गोल केला. त्याने संघाला 53 व्या मिनिटाला मिळवून दिलेली ही आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली व सौदीने एक अशक्यप्राय व स्वप्नवत विजयाची नोंद केली.
विश्वकरंडक स्पर्धेचे संभाव्य विजेता मानल्या जात असलेल्या अर्जेन्टिनासाठी हा पहिल्याच सामन्यातील पराभव खूप मोठा धक्का मानला जात आहे. सलग 36 सामने जिंकणाऱ्या अर्जेन्टिनाची विजयी मालिका या पराभवामुळे खंडित झाली. आता येत्या रविवारी त्यांची मेक्सिकोशी तर, 30 नोव्हेंबरला पोलंडशी लढत होणार आहे. सौदी अरेबियाचा विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासातील हा केवळ तिसराच विजय ठरला. अर्जेन्टिला आता उपउपांत्यपूर्व फेरी गाठायची असेल तर पुढील दोन्ही सामने जिंकावेच लागतील अन्यथा त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात येणार आहे.