कोल्हापूर – कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना गतविजेता फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात लुसेल स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्याच्या शेवटच्या क्षणी पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा ४-२ अशा फरकाने पराभव करत ३६ वर्षानंतर फिफा विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ २-२ अशा बरोबरीत राहिले. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत पोहोचला.
या अगोदर दोन्ही संघांनी फिफा विश्वचषक ही स्पर्धा दोनदा जिकंलेली आहे. गतविजेत्या फ्रान्सने १९९८ आणि २०१८ मध्ये विजेतेपद जिंकले होते. तर दुसरीकडे अर्जेंटिनाने १९७८ आणि १९८६ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यात यश मिळवले होते.
दरम्यान, गेल्या अनेक दशकांपासून उराशी बाळगलेलं स्टार फुटबॉलपटू मेस्सीचं स्वप्न पूर्ण झालं आणि जगभरातील त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. असाच जल्लोष कोल्हापुरातही पाहायला मिळाला आहे. सामना झाल्यानंतर कोल्हापुरात फुटबॉलप्रेमींनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांचा गजर करत अख्खं शहर दणाणून सोडलं. यावेळी सगळीकडे आनंदाचे वातावरण दिसून आले होते.
कुस्तीनंतर कोल्हापूरकर फुटबॉल या खेळावरच जीवापाड प्रेम करतात, हे याआधीही अनेकदा पाहायला मिळालं आहे. मात्र, यंदाच्या फिफा विश्वचषकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा याच दर्शन झालं आहे. यावेळी शहरात लिओनेल मेस्सीचे भले मोठे पोस्टर उभारण्यात आले होते. तसेच, कोल्हापुरात स्क्रीन लावून अंतिम सामना पाहण्यात आला होता.