नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देशभरात करोनाने पुन्हा एकदा आपले डोके वर काढले आहे. दिवसागणिक करोनाबाधितांचे प्रांत वाढताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय यंत्रणा आता सतर्क झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा देशातील काही राज्यांमध्ये मास्क सक्ती करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
देशाची राजधानी दिल्लीतील सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये चाचणी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, करोना संसर्गामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी देशात आज आणि उद्या देशभरात मॉकड्रिल घेण्याची तयारी सुरू आहे.
वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी आणि शाळांमध्ये मास्क घालणे बंधनकारक केले आहे. जिल्हा प्रशासन आणि पंचायतींनाही करोना प्रोटोकॉल पाळले जातील याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केरळ सरकारने गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांसाठी मास्क अनिवार्य केले आहेत. पुद्दुचेरी प्रशासनाने तत्काळ प्रभावाने सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य केले आहेत.
दरम्यान, रविवारी गेल्या 24 तासांत देशात 5,357 नवीन रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची संख्या 32,814 वर पोहोचली आहे. शनिवारी 6,155 नवीन प्रकरणांची नोंद झाली. गेल्या 24 तासांत केरळमध्ये 1801 नवीन रुग्ण आढळले आहेत. एर्नाकुलम, तिरुअनंतपुरम आणि कोट्टायम जिल्ह्यात वेगाने रुग्ण आढळत आहेत.