कोलकाता – बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान बॉलीवूडवरच नाही तर करोडो चाहत्यांच्या मनावरही राज्य करतो. त्यामुळेच त्याला बॉलिवूडचा बादशाह असेही म्हटले जाते. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यानंतर आता त्याचे आणखी एका कारणामुळे कौतुक केले जात आहे.
किंग खानने अलीकडेच कोलकाता नाईट रायडर्सची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी सामना पाहण्यासाठी कोलकाता येथे भेट दिली होती. यावेळी त्याने कोलकातील अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या लोकांची देखील भेट घेतली. शाहरुख खानचे अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या लोकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये शाहरुखसोबत काही महिला दिसत आहे. शाहरुखची भेट झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे.
अॅसिड हल्ल्यातील पीडितांचीही भेट घेत त्यांच्यासोबतची काही फोटो इंस्टाग्रामवर एका फॅन पेजद्वारे शेअर करण्यात आले आहे. त्यानंतर आता शाहरुखच्या या कामगिरीचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे प्रचंड कौतुक करत आहेत. ‘किंग ऑफ हार्ट’, ‘सुपरस्टार असला तरी शाहरुखचे पाय आजही जमिनीवरच आहेत’, अशा कमेंट्स चाहते करत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, शाहरुख खानचा ‘जवान’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ‘डंकी’ या सिनेमातही तो दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. या सिनेमात शाहरुखसोबत अभिनेत्री तापसी पन्नू देखील दिसणार आहे. ‘पठाण’च्या यशानंतर आता शाहरुखच्या आगामी सिनेमांची चाहते देखील आतुरतेने वाट पाहत आहेत.