इस्लाबामाद – पाकमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे. करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णवाढीचा दर तब्बल 7.8 टक्क्यावर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात पाकिस्तानात 61 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत मृतांचा आकडा 13 हजार 717 वर पोहोचला आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 24,592 इतकी आहे.
तिसरी लाट आल्यामुळे रुग्णालयांवर मोठा भार पडला आहे. बेड आणि रुग्णसंख्या यांचे गणित जुळवताना प्रशासनाची दमछाक होते आहे.
लाहोरमधील तीन मोठ्या रुग्णालयातील करोना लस संपली आहे. धक्कादायक म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यासाठीही लस उपलब्ध नाही.
पाकिस्तान लसीसाठी चीनवर अवलंबून आहे. पाकिस्तानात कोरोना लस निर्मिती होत नाही. त्यामुळे चीनने लस पाठवली तरच पाकिस्तानात लसीकरण होते.
दरम्यान, पाकिस्तानला चीनशिवाय जागतिक आरोग्य संघटनेची कोवॅक्स ही लसही मिळण्याची आशा आहे. गरिब आणि कमी उत्पन्न असलेल्या राष्ट्रांना ही लस पुरवण्यात येत आहे. यानुसार पाकिस्तानला 1 कोटी 71 लाख 60 हजार डोस मिळणार आहेत. सध्या पाकिस्तानातही 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे.
दरम्यान, पाकिस्तानात करोना आटोक्यात येत नसल्याने, अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात येत आहे. जवळपास 7 शहरात नव्याने लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. इथे शाळा-कॉलेजसह सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. रमजानचा महिना तोंडावर असल्याने, पाकिस्तानातील बाजारांमध्ये गर्दी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.