महाराष्ट्राची धावपटू संजीवनी जाधव हिने पतियाळातील फेडरेशन करंडक मैदानी स्पर्धेत रजतपदक जिंकत थाटात पुनरागमन साजरे केले. तब्बल दोन वर्षे ती मैदानी स्पर्धेत भाग घेऊ शकत नव्हती. या स्पर्धेत मात्र, तिने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली व आगामी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सज्ज होत असल्याचेही सिद्ध केले.
मूळची नाशिकची असलेल्या संजीवनीवर उत्तेजक द्रव्य सेवनाचे आरोप झाले होते व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या आचारसंहितेचा भंग केल्यामुळे तिच्यावर दोन वर्षांची बंदी लावली गेली होती. ही बंदी संपल्यावर जिद्दी संजीवनीने थाटात पुनरागमन केले. पतियाळात झालेल्या स्पर्धेत तिने रजतपदकावर मोहोर उमटवली. तरीही तिला केवळ दीड सेकंदांच्या फरकाने सुवर्णपदकाने हुलकावणी दिल्याची खंत जाणवत असेल. या स्पर्धेत संजीवनीने 34 मिनिटे 01.26 अशी वेळ देत रजतपदक पटकावले.
चांदवड तालुक्यातील वडाळीभोई गावात 12 जुलै, 1996 रोजी संजीवनीचा जन्म झाला. लहानपणापासूनच खेळात चुणूक दाखवायला सुरुवात केली. कुस्तीमध्ये ती रस घेऊ लागली व तिने यशही मिळवले. मात्र नंतर अचानक तिला धावपटू होण्याच्या ध्येयाने पछाडले व त्यातही तिने आपले नाव उंचावले. धावपटू होण्यासाठी व शास्त्रीय सराव मिळावा यासाठी ती नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये दाखल झाली. 2012 सालापासून नाशिकच्या साई सेंटर येथे विजेंद्रसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करू लागली.
विजेंद्रसिंग यांचे मार्गदर्शन व तिची जिद्द यातून तिने मैदानी क्रीडा स्पर्धेतही आपली गुणवत्ता सिद्ध केली. कविता राऊतसारख्या स्टार धावपटूच्या छायेतही संजीवनीने आपले कर्तृत्व सिद्ध केले. कविताचाच आदर्श समोर ठेवत संजीवनीने 3 हजार मीटर, 5 हजार मीटर व 10 हजार मीटर शर्यतींमध्ये यश मिळवायला सुरुवात केली. 2013 साली मलेशियातील अशियायी शालेय क्रीडा स्पर्धेसाठी तिची निवड झाली व तिने परदेशातही आपल्या यशाचे तोरण बांधले व रजतपदक पटकावले. पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 1500 व 3 हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिने रजतपदक पटकावले. त्याच वर्षी ब्राझीलमध्ये झालेल्या जागतिक शालेय क्रीडा स्पर्धेत 3 हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेतही तिने रजत पदकाला गवसणी घातली. त्यानंतर तिची घोडदौड वेगाने सुरू झाली.
दक्षिण कोरियात झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत 20 वर्षांआतील मुलींच्या गटात 10 हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. कोइम्बतूरमध्ये झालेल्या स्पर्धेत 10 हजार मीटर गटात व 5 हजार मीटर गटात लागोपाठ दोन सुवर्णपदके पटकावली. 2017 साल हेदेखील संजीवनीसाठी स्वप्नवत ठरले. भुवनेश्वर येथे झालेल्या 5 हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिने ब्रॉंझपदक पटकावले. आशियाई क्रीडा स्पर्धेत तैवानमध्ये तिने रजतपदक मिळविले. संजीवनीने 5 हजार मीटर शर्यतीत ब्रॉंझपदक मिळवले. कविता राऊतनंतर आशियाई स्पर्धेत ब्रॉंझपदक जिंकणारी ती नाशिकची दुसरी धावपटू ठरली.
अमित डोंगरे