भीतीला करा बाय-बाय…

फोबियाज या कॉमन आजारातील बरेच रुग्ण पाहायला मिळतात. साधारणत: एखाद्या गोष्टीची प्रचंड भीती, त्या भीतीने त्या गोष्टीचे नुसते नाव ऐकले वा वाचले, तर होणारा थरकाप, ती भीती अकारण व अधार्मिक असते. ती विशिष्ट गोष्ट टाळण्यास व्यक्ती कसोशीने प्रयत्न करीत असते. जरी ही विशिष्ट भीती बऱ्याच लोकांत असली, तरी त्याच्या उपचारासाठी सहसा कुणीही येत नाहीत.

या भीतीमुळे जर दररोजच्या जीवनात किंवा कामात व्यत्यय निर्माण होत असेल, तर मात्र ही गोष्ट अतित्रासदायक होते. 5-8 टक्के लोकांना हा आजार असू शकतो. त्यात प्रामुख्याने तीन फोबियाज आहेत. सोशल फोबिया, स्फेसिफीक फोबिया, अगोराफोबिया. या भीतीबरोबर पॅनिक ऍटॅकही येऊ शकतो.

विशिष्ट वस्तूची किंवा परिस्थितीची भीती म्हणजे स्फेसिफीक फोबिया होय. यात चक्कर येणे, पॅनिक होणे किंवा परिस्थितीवर नियंत्रण गमावण्याची भीती प्रचंड असते. स्फेसिफिक फोबिया 5 प्रकारचा असतो. प्राण्यांची भीती, नैसर्गिक वातावरणाची, रक्त-इंजेक्‍शन-इजा प्रकार, परिस्थितीची व इतर. हे प्रामुख्याने 10-13 वर्षांच्या मुलांत दिसतात.

फोबियाची लक्षणे : प्रचंड चिंता व भीती निर्माण होणे. विशेषत: ती भीतीदायक गोष्ट समोर आल्यास, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ती गोष्ट टाळण्याचा कसोशीने प्रयत्न करणे. त्यामुळे कार्यात निर्माण होणारा व्यत्यय. ही भीती अकारण, अवास्तव व प्रचंड आहे याची जाणीव असणे पण, तरीही ती नियंत्रित न करता येणे, घाम सुटणे, श्‍वासास त्रास होणे, धडधडी होणे, हातापायाचा थरकाप होणे, आवंढा गिळणे, छातीत गट्ट होणे, घसा कोरडा पडणे, पोटात गोळा येणे, अंग गरम होणे, जीव कासावीस होणे, चक्कर येणे, डोके दुखणे.

स्फेसिफिक फोबियात कोळीची भीती (आऱ्याकनो फोबिया), सापांची भीती (ओफिडीयो फोबिया), उंचीची भीती (ऍक्रो फोबिया) हे खूप कॉमन आहेत. कुत्र्यांची भीती (सॉयनो फोबिया), क्‍लॉस्ट्रो फोबिया (बंद किंवा लहान जागेची भीती) हे ही बऱ्याच लोकांत असतात. सीटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅन हा तपास अनेकदा करायला लागते. त्यासाठी एका मशीनमध्ये टाकले जाते. ज्यांना क्‍लास्ट्रो फोबिया असतो, ती हे तपास करतच नाहीत. मुलांत स्कूल फोबिया एक्‍झामे फोबिया हे दिसतात.

ही मुले शाळेला व परीक्षेला जाण्याचे टाळतात. त्यांचा अभ्यास चांगला असूनही ते खूप घाबरतात. त्यांचा अभ्यास चांगला झालेला असतो. इतरवेळी ते उत्तरे छान देतात. मात्र, परीक्षेत त्यांचे सर्वच बिनसते व ते नापासही होऊ शकतात. हे फोबियाज हे सामाजिक कारणांमुळे होऊ शकतात. प्रत्येकाच्या काही चुकीच्या शिकण्यामुळे होतात. काऊन्सिलिंग करून ती चुकीची शिकवण दूर करावी लागते. तसेच औषधांचाही यात बराच उपयोग होतो.

– डॉ. चैतन्य जोशी

Leave A Reply

Your email address will not be published.