पुणे (प्रतिनिधी) – भरधाव वेगात असलेली कार डिव्हायडरवर धडकून झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी कार चालवत असलेल्या मुलावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांडुरंग जयराम कुलकर्णी (75) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पांडुरंग हे मुलगा आणी सुनेबरोबर कारमधून सोमवारी रात्री पुणे-सोलापूर रस्त्याने चालले होते. यावेळी त्यांचा मुलगा गाडी चालवत होता. भरधाव वेगातील त्याची गाडी रस्त्यावरील डिव्हायडरला धडकून डिव्हायडरवर चढली.
या अपघातात पांडुरंग यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा व सून किरकोळ जखमी झाले. अपघातास कारणीभूत ठरल्याने पांडुरंग यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अहिवळे करत आहेत.