नवी दिल्ली – मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. मराठा आरक्षणावरील स्थगिती तूर्तास कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने हा राज्य सरकारसाठी मोठा धक्का मानला जातोय. याप्रकरणी २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणीस सुरुवात होईल असंही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याने राज्यातील नोकरभरती रखडली होती. सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगितीपूर्वीची नोकरभरती करण्याची परवानगी देखील नाकारली. यामुळे राज्यातील नोकरभरतीची प्रक्रिया आणखी लांबणीवर पडणार असून हा ठाकरे सरकारसाठी मोठा धक्का आहे.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने बाजू मांडताना सरकारी वकिलांनी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी बाजू मांडली. मात्र न्यायालयाने या प्रकरणात विस्तृत सुनावणीत केली जाईल असं स्पष्ट केलं.